कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : ३७ वर्षांपूर्वी अत्यंत मर्यादित साधनसामग्रीच्या माध्यमातून सुरू झालेल्या पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेने सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करत आज भक्कम आर्थिक वाटचाल केली आहे. ठेवीदारांनी संस्थेत ठेवलेली ठेव ही त्यांच्या कष्टाची आणि श्रमाची आहे. हा पैसा आमच्या विश्वासावर ठेवलेला असल्याने हा पैसा जपण्याची जबाबदारी संस्थेची आहे. त्याकरिता वसुली कडक करावी लागते त्यामुळे कधी कटुता ही येते. प्रसंगी जनतेच्या हितासाठी कटुता घेण्याची तयारी ठेवत पारदर्शक कामकाज करून ठेवीदारांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही, व यापुढे देखील जाऊ देणार नाही असे प्रतिपादन पोहेगाव नागरी पतसंस्थेचे संस्थापक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले.

पोहेगाव येथे पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना नितीनराव औताडे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे होते.

नितीनराव औताडे म्हणाले की, ग्रामीण भागातून सुरू झालेली ही संस्था आज शहराकडे झेप घेत असून, आपल्या विश्वासार्ह कारभारामुळे संस्थेने आर्थिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. चालू आर्थिक वर्षात संस्थेने २२९ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला आहे. येत्या काही वर्षांत संस्थेच्या ठेवी ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संस्थेच्या थकीत कर्जाच्या वसुलीबाबत बोलताना औताडे म्हणाले की, कर्जवाटपाबरोबरच कर्जाची वेळेत परतफेड होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. थकीत कर्जदारांकडून वसुली करताना प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतात. संस्थेची आर्थिक शिस्त आणि सभासदांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी वसुलीची प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

संस्थेचा कारभार सध्या नाशिक व पुणे विभागातील दहा जिल्ह्यांमध्ये सुरू झाला असून, संस्थेला महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र मिळावे यासाठी सभेत ठराव संमत करण्यात आल्याची माहितीही नितीनराव औताडे यांनी दिली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा सादर केला. संस्थेला २ कोटी ६४ लाख रुपये इतका नफा झाल्याचे त्यांनी सांगितले. सभासदांचा सहभाग आणि संस्थेवरील त्यांचा विश्वास याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, सभासदांना ९ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

सभेच्या प्रारंभी प्रास्ताविक व विषयपत्रिकेचे वाचन आप्पासाहेब कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन रियाज शेख यांनी केले, तर आभार असिस्टंट जनरल मॅनेजर विठ्ठल घारे यांनी मानले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विलास रत्ने, कोपरगाव बाजार समितीचे संचालक अशोकराव नवले, संचालक रमेश झांबरे, ॲड. शिवाजी खामकर, उपसरपंच अमोल औताडे, ऋत्विक औताडे, रवींद्र औताडे, प्रकाश औताडे, प्रशांत रोहमारे, भाऊसाहेब वाघ, प्रमोद भालेराव, रामचंद्र ठोंबरे, अर्जुन पवार, सूर्यभान औताडे, अरुण डोखे, सोमनाथ सोनवणे, बाळासाहेब औताडे, चांगदेव वाके, प्रतापराव गायकवाड, व्यवस्थापक सुभाष औताडे, विठ्ठल घारे, आप्पासाहेब कोल्हे, मोजड यांच्यासह सर्व संचालक, सभासद, कर्मचारी व कलेक्शन प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


