ग्रामीण खेळाडूंच्या कौशल्यांना योग्य दिशा हवी – सुमित कोल्हे

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. १७ : ग्रामीण भागातील खेळाडू आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड कौशल्य दडलेले असते. त्यांना योग्य प्रशिक्षण, आवश्यक सुविधा आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते राष्ट्रीय स्तरावर आपल्या गुणवत्तेची प्रभावी छाप उमटवू शकतात. कोपरगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करून ही बाब अनेकदा सिद्ध केली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त प्रतिभेला योग्य दिशा मिळाल्यास ते देशपातळीवरही सर्वोच्च स्थान मिळवू शकतात, याचे ज्वलंत उदाहरण संजीवनी सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या ब्रास बँड पथकाने देशात अव्वल क्रमांक पटकावून दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले.

   क्रीडा व संचालनालय, महाराष्ट्र  राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर अंतर्गत कोपरगांव तालुका क्रीडा समितीच्या वतीने संजीवनी सैनिकी स्कूल अँड  ज्युनिअर कॉलेजच्या भव्य मैदानावर १९ वर्षे  वयोगटांतर्गत तालुका स्तरीय फुटबॉल सामन्यांच्या उद्घाटन प्रसंगी सुमित कोल्हे हे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी कोपरगांव तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष नितिन निकम, डायरेक्टर ऑफ गव्हर्नन्स डी. एन. सांगळे, प्राचार्य कैलास दरेकर, कॅम्पस अॅडमिन विजय भास्कर, विविध संघांचे टीम मॅनेजर्स व्यासपीठावर हजर होते. तालुक्यातील एकुण १२ संघांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला.

  कोल्हे पुढे म्हणाले की, फुटबॉल सामन्यात विजय मिळविण्यासाठी खेळाडूंना गोलचे ध्येय समोर ठेवून सातत्याने प्रयत्न करावे लागतात. त्याचप्रमाणे संजीवनी समूहाचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय निश्चित केले आणि त्याच्या पूर्ततेसाठी आयुष्यभर कार्य केले. त्या ध्येयपूर्तीचा वारसा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितीनदादा कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेण्याचे कार्य आम्ही सर्वजण करत आहोत. तालुक्यातील युवकांनी शिक्षण, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत मोठी झेप घ्यावी, यासाठी त्यांना आवश्यक संधी, सुविधा आणि विविध व्यासपीठे उपलब्ध करून दिली जात आहेत.

ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा देणे ही आमची सातत्यपूर्ण भूमिका राहिली आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून संजीवनी सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला प्राप्त झालेली १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात वापरण्यात आलेली टी-५५ रणगाडा वॉर ट्रॉफी ही राष्ट्रप्रेम, शौर्य आणि कर्तृत्वाची प्रेरणादायी साक्ष आहे. या ऐतिहासिक स्मृतीकडून युवकांनी देशभक्ती, शिस्त आणि जिद्दीची प्रेरणा घ्यावी, असा आशावाद सुमित कोल्हे यांनी व्यक्त केला.

निकम यावेळी म्हणाले की, तालुक्यातील ग्रामीण खेळाडूंना हिरव्यागार लॉनने सजलेल्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणे ही कौतुकाची बाब आहे. ‘खेळ हा आयुष्य जगायला शिकवतोय पराभवातून त्रुटी शोधून पुढील यशाची तयारी करावी,’ असा संदेश त्यांनी खेळाडूंना दिला. खेळाडूंनी सदैव खिलाडूवृत्ती जोपासावी, असे आवाहन डी. एन. सांगळे यांनी केले. टीम मॅनेजर प्रा. अमोल ठोंबरे यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना उपलब्ध असलेल्या शासकीय नोकरीच्या संधींची माहिती दिली. प्राचार्य दरेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. पहिला सामना संजीवनी सैनिकी स्कूलचा विद्यार्थी राघवेंद्र पाठक याच्या विधिवत्त मंत्रोच्चरांनी सुरू झाला. स्कूलच्या ब्रास बॅण्ड पथकांच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply