धरण झाली फुल्ल, पाण्याअभावी पिकं झाली गुल्ल

 कोपरगाव तालुक्यातील १२ हजार हेक्टर पिकं पाणी अभावी सुकली

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : एकेकाळचा कॅलिफोर्निया समजलेला कोपरगाव तालुका आज भर पावसाळ्यात होरपळतोय. गेल्या महीण्याभरापासुन पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील तब्बल १० ते १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील उभे पिकं पाण्याअभावी होरपळून गेली आहेत. नाशिकच्या घाटमाथ्यावरील सर्व धरणात पाणी फुल्ल आहे. माञ लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या  पिकांना पाणी नसल्याने उभी पिकं वाळून गेली आहेत.

तालुक्याली बहुतांश भागातील  शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे २५ ते ३०टक्के नुकसान केवळ पाण्याअभावी झाले असुन  जर पावसाने कृपा केली तर उर्वरित पिकांना थोड्याबहुत प्रमाणात जीवदान मिळण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी दिली आहे. ते म्हणाले की, काही भागातील शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध असल्यामुळे पिकांना पाणी मिळाल्याने त्यांच्या पिकांचे  नुकसान  सरासरी १० ते ५० टक्के  होईल, पण जिथे पाणी नाही तिथे शंभर टक्के नुकसान होत आहे, त्यामुळे आता पावसाशिवाय गत्यंतर नाही. 

जेऊर कुंभारी येथील उपसरपंच यशवंत आव्हाड यांच्या  शेतातील सोयाबीन पाण्याअभावी  संपूर्ण वाळून गेल्याने त्यांनी तर डोक्याला हातलावून आडव्या  पिकात बसुन आपल्या आश्रुंना वाट मोकळी करीत खंत व्यक्त केली. 

 दरम्यान चांदेकसारे येथील शेतकरी बाबासाहेब होन यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, उभे पिकं डोळ्यांदेखत होरपळून जात आहे. पिकाला पाणी नाही, पण डोळ्यात पाणी येत आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर पावसाने दडी मारल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. सोयाबीन, मका, कपाशी, उसासह अनेक पिके पाण्याअभावी जळून जात आहेत. 

  उपलब्ध असलेल्या पाण्यावर उरलेल्या पिकांना  जगवण्यासाठी पाणी द्यायचे म्हंटले तर शासनाच्या अवकृपने लाईट वेळवर नसते. विजेचा लपंडाव सुरु असल्याने पाणी असुनही पिकांना पाणी देता येत नाही. दोन्ही बाजुने शेतकरी संकटात  सापडला असुन शासनाने त्वरीत  दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी शेतकरी होन यांनी  केली आहे. 

 दरम्यान यावर्षी कमी पाऊस झाला असला तरीही नाशिक जिल्ह्यातील धरणं काठोकाठ भरली आहेत. त्यात दारणा, भाम, भावली, वालदेवी, गंगापूर, कश्यपी, आळंदी, भोजापूर, गौतमी, ओझरखेड, वाघाड, तिसगाव , पुणेगाव, हरणबारी, केळझर हि धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर वाकी- ९५ .४७, मुकणे – ८३.५५ , कडवा – ९८.२२, पालखेड – ९८.१, करंजवण ९९.२८ टक्के भरले आहे, तर नांदूर मध्यमेश्वर बंधाराही शंभर टक्के भरला आहे.

त्यामुळे धरण परिसरात सध्या  पाऊस नसला तरीही उपलब्ध  पाणीसाठा तब्बल  ९६.३२ टक्के आहे. धरणामध्ये पाणी जरी उपलब्ध असले तरीही शेतकऱ्यांच्या पिकापर्यंत पोहचले नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थीक नुकसान झाले आहे. पाण्याअभावी कोपरगाव तालुका व्याकुळ झाला आहे. पावसाने आजूनही दडी मारली तर  तालुक्यातील अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 

 विद्युत वितरण कंपनीने किमान विद्युत पुरवठा सुरळीत केला तर तालुक्यातील उरल्यासुरल्या पिकांना जीवदान मिळुन शेतकऱ्यांचे आर्थीक नुकसान कमी होईल. अन्यथा होते नव्हते ते सर्व एकाचवेळी संपूर्ण शेतकरी राजा चहुबाजूंनी संकटात सापडणार आहे. 

Leave a Reply