के.जे.सोमैया व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात जयकर व्याख्यानमाला संपन्न


 कोपरगाव प्रतिनिधी, दि.०९ : “कविता म्हणजे डोळ्यातले अंजन, पायातले पैंजण, कविता विचारांची प्रांजळ व प्रभावी अभिव्यक्ती असते. कवितेने समतेचा इतिहास लिहावा, कवितेने क्रांतीची फुले पेरावीत, उद्याच्या सुंदर दिवसांसाठी कविता अनेक वेळा घडवते. भावनेचा तरल स्पर्श झाल्यावर कवितेचे भावगीत बनते.” असे प्रतिपादन प्रसिद्ध कवयित्री आणि प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे यांनी येथे केले.

स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या ‘कविता- भाव कविता-चित्रपट गीते’ या विषयावर आयोजित समारोपाच्या व्याख्यान सत्रात प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. कोकाटे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. एस. यादव होते.

प्राचार्य डॉ. बी. एस. यादव म्हणाले की, “बहि:शाल शिक्षण मंडळाच्या माध्यमातून होणाऱ्या बॅ. डॉ. जयकर व्याख्यानमाला म्हणजे पाठ्यपुस्तकेतर विविध विषय समजावून घेण्याचे एक चांगले व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन आपले व्यक्तिमत्व बहुआयामी बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ‘विना अपघात प्रवास : काळाची गरज” या विषयावर संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते माँ संतोष पवार यांनी गुंफले याप्रसंगी पवार यांनी सुरक्षित प्रवासासाठी सरकारी पातळीवरून केले जाणारे प्रयत्न त्याचबरोबर वाहनधारकांनी पाळावयाचे नियम आदींविषयी सखोल मार्गदर्शन केले.

व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ‘वाह क्या बात है!’  या विषयावर नाट्यात्मक सादरीकरणाच्या साह्याने संगमनेर येथील कलावंत मा. सुरेंद्र गुजराथी यांनी गुंफले. व्याख्यानमालेतील तीनही व्याख्यान सत्रांचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय केंद्र कार्यवाह प्रो.जिभाऊ मोरे यांनी करून दिला, तर मंडळाचे सदस्य डॉ. रवींद्र जाधव यांनी तिन्ही व्याख्यान सत्रांचे सूत्रसंचालन केले. डॉ. एम.बी. खोसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, गणित विभाग प्रमुख बी. डी. गव्हाणे प्रा किरण सोळसे, रोहित लकारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.