कोपरगाव व्हॉलीबॉलची पंढरी, हि ओळख बळकट करण्यास प्रयत्न करणार – सुमित कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. 7 : संजीवनी फाउंडेशन, कोपरगाव आणि संजीवनी सैनिकी स्कूल अँड  ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संजीवनी इन्स्पायर २०२६’ या राज्यस्तरीय खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत कोपरगाव स्पाईकर्स संघाने दिमाखदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. घरच्या मैदानावर मिळालेल्या या घवघवीत यशामुळे कोपरगावच्या क्रीडाप्रेमींनी एकच विजयी जल्लोष केला. या अटीतटीच्या स्पर्धेत राहुरी स्पाईकर्स संघाला उपविजेतेपदावर, तर साई शिर्डी संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.

   संजीवनी सैनिकी स्कूलच्या भव्य मैदानावर पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या तब्बल २६ नामांकित संघांनी सहभाग नोंदवला होता. क्वालिफायर फेऱ्यांपासून  सुरू झालेला हा प्रवास प्री-क्वार्टर, क्वार्टर फायनल आणि उपांत्य फेरीतून अंतिम सामन्यापर्यंत अत्यंत चुरशीचा ठरला. अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय नामांकित खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेचा दर्जा कमालीचा उंचावला होता.

   स्पर्धेदरम्यान खेळाडूंचे दमदार स्मॅश, अचूक व प्रभावी ब्लॉक, चपळ बचाव आणि प्रत्येक गुणासाठी झालेली झुंज यामुळे मैदानावर कमालीचे रोमांचक वातावरण निर्माण झाले होते. कोपरगावच्या क्रीडाप्रेमींनी प्रत्येक सामन्याला उत्स्फूर्त गर्दी करत टाळ्या  आणि घोषणांच्या गजरात खेळाडूंचा उत्साह वाढविला.
 

स्पर्धेत विश्वा बनकर याची आदर्श खेळाडू म्हणून, तर राहुरीच्या आदित्य भाग्यवान याची बेस्ट अटॅकर म्हणून निवड करण्यात आली.या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरला श्रीरामपूरचा अवघा १२ वर्षांचा १४ वर्षांखालील राष्ट्रीय खेळाडू शिवराज झिंज. त्याच्या उल्लेखनीय क्रीडाप्रतिभेची दखल घेत आयोजकांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

बक्षीस  वितरण प्रसंगी बोलताना संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे म्हणाले की ग्रामीण भागातील आणि परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे, त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि कोपरगावच्या मातीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणे हाच आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. ‘कोपरगाव ही व्हॉलीबॉलची पंढरी’ म्हणून ओळखली जाते, ही ओळख भविष्यात अधिक बळकट करण्यासाठी यापुढील काळात अजून भव्यदिव्य स्वरूपात, मोठ्या  प्रमाणावर बक्षिसे आणि जागतिक दर्जाच्या सुविधा देऊन या स्पर्धा सुरू ठेवण्याचा आमचा संकल्प आहे.

  ‘संजीवनी इन्स्पायर २०२६’ मुळे क्रीडाप्रेमींना उत्कृष्ट व्हॉलीबॉलचा थरार तर अनुभवायला मिळालाच, पण त्याचसोबत नवोदित खेळाडूंनाही मोठ्या  व्यासपीठावर स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळाली. संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी या कौतुकास्पद उपक्रमाचे विशेष कौतुक करत सर्व विजेत्या व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Leave a Reply