कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : संगमनेर येथुन कोपरगावकडे येणाऱ्या एसटी बसच्या चालकाने प्रसंगावधान राखले नसते तर शनिवारी ६० प्रवाशांना घेवून जाणाऱ्या बसचा मोठा अपघात झाला असता. संगमनेर हून कोपरगावकडे जाणारी बस क्रमांक एम एच ०७ सी ९२५० हीचे स्टेअरिंग अचानक तुटल्याने बसमधील ६० प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. चालक मच्छिंद्र शिरसाठ यांनी प्रसंगावधान राखत अतिशय चालाखीने बस रांजणगाव देशमुख येथे अलगत बाजुला उभी केली. जर चालकाने वेळेत लक्ष दिले नसते तर बसचा अपघात झाला असता.

बसचे स्टेअरिंग तूटून थेट चालकाच्या हातात आल्याने गाडीत प्रवाशांच्या काळजाचे ठोके चुकले होते. कोपरगाव आगारातील बंद पडक्या गाड्या प्रवाशी वाहतुकीसाठी पाठवून आगार प्रमुख कोणता आसुरी आनंद घेत आहेत. वारंवार नागरीकांच्या तक्रारी, वाहक चालकांच्या तक्रारी, पञकार, आजी माजी आमदारांनी तक्रारी करुनही जर आगार प्रमुख ऐकत नसेल तर याचा अर्थ आगार प्रमुखाच्या चुकीच्या कामाला साथ देण्यासाठी व प्रवाशांच्या जीवाशी खेळण्यामागे पाठीमागे कोणाचा हात आहे? असा संतप्त सवाल केला जात आहे.

बंद पडणाऱ्या गाड्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी कोंबून एसटीचा प्रवास सुखाचा म्हणत दुःखाचा करणारे आगार प्रमुख एसटी महामंडळाचे लाडके झाले की काय? बेजबाबदारपणे कारभार करणाऱ्या आगार प्रमुखामुळे कोपरगाव आगाराच्या बसमधून प्रवास करणे म्हणजे साक्षात यमसदनी जाण्याच्या मार्गाने प्रवास करणे असाच प्रकार सध्या सुरू झाला आहे. कोणी निंदा कोणी वंदा प्रवाशांचा जीव धोक्यात घालणे हाच आमचा धंदा अशी अवस्था एसटी महामंडळाची झाली आहे.

दररोज कोपरगाव आगाराच्या गाड्या बंद पडत असुनही एसटी महामंडळ जाणुनबुजून कोपरगाव आगाराला नवीन ज्यादा गाड्या न देता जुन्या खटारा झालेल्या गाड्यातून प्रवाशी वाहतूक करायला लावले जात आहे. सध्या पुण्याच्या प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला असला तरी संगमनेर व नाशिक मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका निश्चित आहे. ज्या गाड्या वारंवार दूरूस्त करूनही चालत नसतील किंवा सतत त्यांच्या बिघाड होत असेल तर आगार प्रमुख अशा गाड्या प्रवाशी वाहतुकीसाठी जाणुनबुजून देतायत अशी शंका येत आहे.

शनिवारी बंद पडलेली बस क्रमांक एम एच ०७ सी ८२५० ही कोपरगाव-संगमनेर – कोपरगाव हि बस इतकी नादुरुस्त असतानाही गर्दी असलेल्या मार्गाने का पाठवण्यात आली.आगारातील कार्यशाळेत काम करणाऱ्यांना गाड्या नादुरुस्त आहेत हे माहीत असुनही चालकांना जबरदस्तीने गाड्या देतात का? कि चालकांची दिशाभूल केली जाते. शनिवारी नाशिकाला जाणारी ११ वाजताची कोपरगाव आगाराची गाडी प्रवाशी घेवून निघाली पुढे साईबाबा तपोभूमी येथे गेल्यावर अचानक गाडीच्या इंजिनमध्ये आवाज सुरु झाला. चालकाच्या लक्षात आल्यानंतर ती बस पुन्हा कोपरगाव आगारात परत आली, नंतर दुसऱ्या बसने प्रवाशी घेवून गेले. दोन दिवसांपूर्वी जवळे येथे बस रस्त्यात बंद पडली होती.

कोपरगाव आगाराच्या बस रस्त्यात बंद पडण्याचा हा सिलसिला काही बंद होत नाही. हा सिलसिला बंद होत नाही कि, जाणुनबुजून केला जातोय असा सवाल पडत आहे. आगार प्रमुखाने नादूरूस्त गाड्या पाठवणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळल्यासारखा आहे. कोपरगाव आगाराच्या गाड्या जर वारंवार गाड्या रस्त्यावर बंद पडत आहेत याचा अर्थ बहुतांश गाड्या केवळ वयाने नाही तर अवस्थेने कालबाह्य झाल्या आहेत तेव्हा कोपरगाव आगाराला ज्यास्तीच्या नवीन येणं गरजेचं आहे. अन्यथा एखादी अपघाताची मोठी घटना घडल्यानंतर नवीन गाड्या पाठवणे म्हणजे माणसांच्या जीवाची बेकींमत केल्यासारखे होवू शकते.


