जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोल्हे समर्थकांची एकजूट, आमदार काळेंना पुन्हा कोल्हेंचा पाठिंबा

सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांसाठी आ.विवेक कोल्हे, मा.आ.स्नेहलताताई कोल्हे व बिपीनदादा कोल्हे एकत्रित मतदान केंद्रावर, समर्थक मतदारांनाही सोबत घेत बजावला मतदानाचा हक्क

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असताना कोपरगावमध्ये कोल्हे कुटुंबाच्या राजकीय एकजुटीची विशेष चर्चा रंगली. सहकार विकास पॅनलच्या माध्यमातून बिपीनदादा कोल्हे यांची सोसायटी मतदारसंघातून यापूर्वीच बिनविरोध निवड झालेली असताना उर्वरित जागांसाठी होत असलेल्या मतदानात पॅनलच्या उमेदवारांच्या विजयासाठी विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि बिपीनदादा कोल्हे यांनी सोमवारी सकाळी आपल्या समर्थक मतदारांना एकत्रित घेत मतदान केंद्र गाठले आणि मतदानाचा हक्क बजावला.

कोल्हे कुटुंबाने एकत्रितपणे मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची घेतलेली भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत कोल्हे कुटुंबाने आपली संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली.विशेष म्हणजे, राजकीयदृष्ट्या पारंपरिक विरोधक मानले जाणारे आमदार आशुतोष काळे यांना कोल्हे कुटुंबाने यापूर्वी विधानसभा निवडणुकीतही कार्यकर्त्यांना मतदानाचे आवाहन करून महत्त्वपूर्ण सहकार्य केले होते. त्यातून काळे यांना सत्तेच्या राजकारणात बळ मिळाले.

आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही कोल्हे कुटुंबाने आपल्या समर्थक मतदारांची ताकद सहकार विकास पॅनलच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभी केल्याचे चित्र दिसून आले.बिपीनदादा कोल्हे यांची बिनविरोध निवड आणि उर्वरित जागांसाठी मतदारांना एकत्रित घेऊन केलेले मतदान यामुळे कोपरगावच्या सहकार क्षेत्रातील कोल्हे कुटुंबाचे राजकीय वजन अधोरेखित झाले आहे.

विरोधकांशी राजकीय मतभेद असले तरी सहकाराच्या व्यापक हितासाठी भूमिका घेण्याची कोल्हे कुटुंबाची परंपरा या निवडणुकीतून पुन्हा चर्चेत आली आहे. मतदारांना एकत्रित घेऊन मतदान केंद्रावर दाखल होण्याचा कोल्हे कुटुंबाचा हा सामूहिक निर्णय जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा राजकीय क्षण ठरला.

Leave a Reply