वाढीव घरपट्टीच्या कटात कोण सामील आहेत यांची चौकशी व्हावी – विधिज्ञ नितीन पोळ

कोपरगाव प्रतिनधी, दि. १७ : मागील चार पाच दिवसापासून वाढीव घर पट्टी कमी करावी म्हणून विविध राजकीय पक्ष, संघटना नगर पालिकेला निवेदने देत आहेत मात्र वाढीव घर पट्टीच्या कटात कोण सहभागी आहेत त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे

आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की मागील दोन वर्षे कोविड साथीने संपूर्ण देशभर थैमान घातले होते त्यावेळी विविध संघटना व नागरिकांनी घरपट्टी व पाणी पट्टी माफ करावी अशी मागणी केली होती त्या वेळी नगर पालिका अस्तित्वात होती नगराध्यक्ष व नगर सेवक कारभार पहात होते त्या दरम्यानच्या काळात घरपट्टी व पाणी पट्टी माफ होण्याचा व तसा प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्याची नागरिकांना अपेक्षा होती मात्र दुर्दैवाने तो निर्णय होऊ शकला नाही.

असे असताना त्याच पदाधिकारी यांच्या काळात कोपरगाव शहरातील मालमत्ता धारकांचा सर्व्हे करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्याचा ठराव झाला त्यासाठी आर्थिक तरतूद झाली प्रत्यक्ष सर्व्हे झाला मात्र हा सर्व्हे करत असताना नागरिकांना अंधारात ठेवले गेले प्रत्यक्ष सर्व्हे करण्यापूर्वी हा सर्व्हे कशा प्रकारे होणार त्या साठीच्या अटी शर्ती ची माहिती नागरिकांना होणे अपेक्षित होते. मात्र त्यावेळी तत्कालीन लोकप्रतिनिधी व नगरपालिका प्रतिनिधी यांनी कोणतीच दखल घेतली नाही.

नुकत्याच नवीन सर्व्हे प्रमाणे वाढीव घरपट्टीच्या नोटिसा नागरिकांना प्राप्त झाल्या नंतर आता विविध पक्ष व संघटना नेते एव्हढेच नव्हे तर ह्या एजन्सीची नेमणूक केली जात असताना गप्प बसून मंजुरी देणारे पदाधिकारी आता घरपट्टी कमी करावी म्हणून निवेदने देत आहेत.

केवळ आगामी नगरपालिका निवडणूक डोळ्या समोर ठेऊन राजकीय नेत्यांना शहर वासीयांचा कळवळा दिसून येताना दिसत असून हा केवळ निवडणुकीचा फार्स आहे. मात्र ही एजन्सी नेमणूक करताना या वाढीव घरपट्टीच्या कटात कोण सहभागी होते हे नागरिकांना समजावे म्हणून या कटाची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी अशी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी केली आहे.