१४६ खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ शेवगावमध्ये भाकप व काँग्रेसचे निदर्शन

शेवगाव प्रतिनिधी, दि.२३ : हुकूमशाह पद्धतीने विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी १४६ खासदारांचे भाजप सरकारने निलंबन केले. या निलंबनाच्या निषेधार्थ येथील भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, लालबावटा रिक्षा युनियन, शहीद भगतसिंग हाॅकर्स यीनायन व इंडिया टीमच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी ‘भाजप हटाव लोकशाही बचाव देश बचाव’ या घोषणांनी परिसर दुमदुमला.

भाकपचे काॅ.संजय नांगरे यांनी देशातील संघ प्रणित भाजपा सरकारने विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांचे निलंबन करून अतिरेकी कारवाई केली असून संसदेत विरोध होऊ नये, सर्व विधेयके बिनविरोध पास व्हावीत म्हणून ही निलंबनाची कारवाई केली. हे सरकार हुकूमशाही पद्धतीने वाटचाल करीत आहे. अघोषित आणीबाणी लागू झाल्याचे दिसते. लोकशाही पायदळी तुडवण्याचे काम होत आहे. नवीन संसदेत सुरक्षा भेदुन काही युवक घुसले याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांना जाब विचारणाऱ्या खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

लोकशाही पद्धतीने प्रश्न विचारलेल्या खासदारांच्या प्रश्नाला उत्तर न देता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई म्हणजे भाजपची दडपशाही असल्याची टीका नांगरे यांनी केली. यावेळी कॉ.संदीप इथापे, कॉ.गोरक्षनाथ काकडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे समीर काझी, प्रकाश तुजारे, असिफ काझी, कचरू मगर, सुधीर बाबर, लालबावटा रिक्षा युनियनचे शंकर काथवटे, कचरू सोनवणे, पिनू जाधव, महेश कुसळकर, जाकीर तांबोळी, संतोष सराफ, वाघमारे सोनू, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनचे इरफान पठाण, जावेद बागवान, जुबेर शेख, अमित भोकरे, गणेश भाडाईत सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.