शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : तालुक्यात पशुधनावरील लम्पी साथ रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधक उपाय म्हणून कोविड साथरोगाच्या धर्तीवर शेवगाव तालुक्यातील बाधीत जनावरांसाठी तातडीने कॉरनटाइन सेंटर सुरु करावेत. आणि सर्व जनावरांना लसीकरण करून पशुपालक शेतक-यांना दिलासा देण्याची मागणी स्वभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी केली आहे. याबाबतची निवेदने सर्व संबधितांना दिली आहेत.
या निवेदनात तालुक्यात बाधित जनावरांसाठी कॉरनटाइन सेंटर सुरु करण्यासाठी आवश्यक ती जागा तसेच बाधित जनावरे नेण्या आणण्यासाठी आवश्यक ती मदत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासनाला देऊ केली असून पशुपालकांना दिलासां देणारा निर्णय झाला नाही तर सर्व बाधित वा संशयित जनावरे तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तसेच पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाच्या प्रांगणात आणून सोडली जातील असा इशाराही फुंदे यांनी शेवटी दिला आहे.
आज अखेर पर्यंत तालुक्याच्या भातकुडगाव, शहरटाकळी, वरूर, हसनापूर, तसेच येथील माळीवाडा परिसरात ६ बाधित जनावरे आढळून आली, पैकी भातकुडगाव व शहरटाकळी येथील जनावरे उपचारानंतर बरी झालेली असून अन्य ४ जनावरांवर सध्या उपचार सुरु आहेत.
तालुक्यात गाय सवर्गातील पशुधनाची संख्या जवळपास ७१ हजाराच्या आसपास असून तालुका पशुसंवर्धन विभागाकडे आतापर्यंत ४१ हजार लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. तालुका पशुसंवर्धन विभाग लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रयत्नपूर्वक काम करत आहे.