शेवगाव प्रतिनिधी, दि २१: सध्या जनावरांना होत असलेल्या लम्पी आजाराबाबत पशुपालकांना मार्गदर्शन करण्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून जनजागृती मोहिम सुरू करण्यांत आली आहे.
याबाबत तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळांतुन विद्यार्थ्यांमार्फत परिपाठ, प्रभात फेरी व्दारे लम्पी रोगाबाबत पशुपालकांना माहिती देण्यांत येत आहे. शिक्षण विभागामार्फत या आजाराबाबत माहितीपत्रके पुरविण्यात आली असून परिपाठात त्याचे वाचन करण्यांत आले आहे.
लम्पी रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून पशु पालकांनी गोठयामध्ये डास, माशा, गोचिड होणार नाही याची दक्षता घ्यावी. गोठयामध्ये बाहेरील व्यक्ती आल्यास प्रथम त्यांचे निर्जुतुंकीकरण करावे. साथीचा आजार सुरु असे पर्यंत बाजारातुन जनावरांची खरेदी विक्री थांबवावी. बाधित जनावर तात्काळ वेगळे करावे. गोठयामध्ये सोडियम हायपोक्लोराईड किवा फिनेल यांची फवारणी करण्याचे आवाहन शिक्षक व विद्यार्था प्रचारफेरी काढून करत आहेत.
तसेच जनावरांच्या अंगावर १०ते ५० मि.मि. व्यासाच्या गाठी, भरपूर ताप, डोळयातुन व नाकातुन चिकट स्त्राव, चारा पाणी खाणे बंद, दुग्ध उत्पादन कमी, काही जनावरात पायावर सुज येवुन लंगडणे अशी लक्षणे दिसुन आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करण्यांच्या सुचना पशुपालकांना विद्यार्थी व शिक्षक करत आहेत.
गटविकास अधिकारी महेश डोके, गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ या मोहिमेवर जातीने लक्ष ठेवून आहेत. केंद्रप्रमुख बबन ढाकणे, सुरेंद्र गिऱ्हे, त्रिंबक फपाळ, पांडूरंग खरड, नितीन मिसाळ, बबन सपकाळ, दत्तात्रय पवार, संतोष ढाकणे, दशरथ गायकवाड, अनिल चव्हाण आदि त्यासाठी सहकार्य करत आहेत.