कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पूजनाचा विषय नसून आचारणाचा आदर्श राजा म्हणून आपण ओळखतो. युवा पिढीने आध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालत निष्कलंक जीवनशैली अंगिकारुन राष्ट्र निर्माणासाठी जगणे हाच छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवण्याचे आवाहन भारत सरकारचे आयुष मंत्रालयाचे निमंत्रित सदस्य व शिवचरित्र व्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे यांनी एका व्याख्यानात केले.
कोपरगांव येथील प्रियदर्शिनी ग्रामीण महिला मंडळ, लोणी संचलित बी.एस्सी.(होमसायन्स) व बी.सी.ए.महिला महाविद्यालयात सूर्यतेज संस्था कोपरगाव यांच्या सहभागातून भारत सरकारचे आयुष मंत्रालयाचे निमंत्रित सदस्य व शिवचरित्र व्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, सूर्यतेजचे संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, पद्मश्री विठ्ठलराव विखे, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील, स्व. नामदेवराव परजणे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे यांचा राजेश परजणे यांनी सन्मान केला.
व्याख्यानात डॉ.शेटे शिवकालीन आणि पानिपत रणसंग्रामातील उदाहरणे सांगत पुढे म्हणाले, मातृशक्तीची ताकद मोठी आहे. निर्माण, संगोपन, संस्कार या शक्ती मातृशक्तीत सामावले आहे. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज संस्काराने घडविले. त्यामुळेच शिवाजी महाराज यांना अठरापगड जातींसह प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळालेले पहावयास मिळते. डॉ.शेटे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आई – वडिलांच्या आज्ञेचे पालन करावे. अध्यायनाच्या वेळेत वाढ करुन आपल्या सर्वोच्च सेवेत जाण्याचा संकल्प करत नोकरीत लाच न स्वीकारण्याची शपथ घेण्याचे सांगितले. आयुष्यात जगायचेच तर राष्ट्रासाठी जगा जनसामान्यांचे वाली व्हा असेही त्यांनी आवाहन केले.
उपस्थितांचे स्वागत राजेश परजणे पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सोनाली मोरे, प्राची रोकडे यांनी केले. स्वागतगीत श्रध्दा त्रिभुवन, श्रेया दवंगे, प्रतिक्षा आव्हाड यांचे समुहाने गायले. तर आभार प्रा.पूनम जिबकारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ.मनोजकुमार लंगोटे , समन्वयक डॉ. किसन थेटे यांच्यसह सर्व शिक्षक – शिक्षिकांनी परिश्रम घेतले. शिवचरित्र व्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे यांच्या व्याख्यानाने महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी मंत्र मुग्ध झाल्या होत्या.