शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : ग्रामीण परिसरातील महिलांनी आपल्या कलागुणांना वाव मिळेल असा उद्योग व्यवसाय निवडून आपल्या कुटुंबाबरोबरच परिसराच्या सर्वांगीण प्रगती मध्ये हातभार लावणे इष्ट होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुक्यातील दहीगावने येथील गरुड झेप महिला संघाच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ तसेच महिला बचत गटाच्या सदस्यांना कर्ज वाटप कार्यक्रमात घुले बोलत होत्या. पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमास प्रांताधिकारी प्रसाद मते तहसीलदार प्रशांत सांगडे गटविकास अधिकारी राजेश कदम, सौ तेजस्विनी घुले, दहिगावनेच्या सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
घुले म्हणाल्या, ग्रामीण परिसरातील महिलांच्या उत्पादनास शाश्वत बाजारपेठ मिळावी तसेच महिलांची आर्थिक प्रगती, यासाठी सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्यास आपण कटिबद्ध आहोत. यावेळी पंचायत समितीच्या गणातील विविध गावातील महिला बचत गटास कर्ज साह्याचे धनादेश देण्यात आले.