रांजणगाव, अंजनापुर येथील बंधारे निळवंडे पाण्याने भरून देण्याची जलसंपदामंत्री यांच्याकडे मागणी – कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : निळवंडे कालव्याचे पाणी कोपरगाव तालुक्यांतील गावांना उपलब्ध व्हावे यासाठी मोठा संघर्ष झाला. काही दिवसापूर्वी साठवण बंधारे भरले जावे यासाठी नागरिकांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. मात्र प्रशासन दिलेला शब्द पूर्ण करत नसल्याने रांजनगाव व अंजणापुर येथील महिला व नागरिक संतप्त होऊन ९ डिसेंबर २०२३ पासून बंधारा निळवंडे पाण्याने जलमय होत नाही तोवर आमरण उपोषण सुरू आहे.

तरीही माझ्या महिला भगिनीना असे उपोषण करावे लागू नये यासाठी सदर बंधारे निळवंडे पाण्याने भरून देण्याची व बहादराबाद व शहापूर येथील तीन साखळी बंधारे भरून देण्याची विनंती मा.आ. सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कोपरगांव तालुक्यातील रांजनगाव अंजनापुर नं. ३ चा तलाव निळवंडे पाण्याने भरून देण्याबाबत ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेतली आहे. कोपरगांव लाभ क्षेत्रामध्ये निळवंड्याचे पाणी ५३ वर्षानंतर आलेले असुन रांजणगाव अंजनापुर नं.३ (मर्याईचा बंधारा) अद्यापही भरलेला नाही. पाणी वहन सध्याचे परिस्थितीमध्ये सुरू आहे. रांजणगांव देशमुख येथे दि.१६/११/२०२३ रोजी आमरण उपोषण झाले. त्यात देखील बंधारा भरण्यात यावा ही प्रमुख मागणी होती

अंतिम टोकापर्यंत अर्थात टेलपर्यंत पाणी पोहोचल्याशिवाय पाणी बंद करणार नाही असे लेखी आश्वासन दिलेले असतानाही रांजणगाव अंजनापुर नं. ३ चा बंधारा भरण्यात आलेला नाही. पर्जन्यमान अत्यल्प आणि दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शेतकरी हवालदिल झालेले असुन बंधारा न भरल्यास पिण्याचे पाणी व पशुधन टंचाईमुळे जगणार नाही.नैसर्गिक असमतोल झाल्याने बिकट परिस्थिती ओढवली आहे.

रांजणगाव आणि परिसरातील सर्वच गावे ही निळवंडे धरणाने पाणी उपलब्ध होऊन सुखी होण्याचे दिवस आले असताना बंधारे भरून देण्यासह पोटचाऱ्या आणि पाणी वितरण व्यवस्था सुरळीत राहणे यासाठी त्वरित काम करण्यासाठी संबधित विभागाला सूचना कराव्या अशीही विनंती निवेदनाद्वारे सौ.कोल्हे यांनी नामदार फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मतदारसंघाच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी अनेक मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केल्या आहेत त्यावर नामदार फडणवीस यांनी ‘कोल्हेताई मी आपल्या पाठीशी आहे’ असे म्हणत जनतेचे प्रश्न सोडिण्यासाठी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.