शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : युवकाच्या अपहरणाच्या दाखल केलेल्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी पोलीस पथकाद्वारे तातडीने तपास केल्यामुळे तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या २४ तासात अपहरीत युवकाची सुटका करुन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात शेवगाव पोलिसांनी यश मिळविले आहे.
या संदर्भात पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की गुरुवारी दिनांक २२ रोजी रात्री पावणेदहा वाजता लक्ष्मण भीमराव बोरुडे रा. शेकटे यांनी त्यांचे चुलते सोनाजी छबुराव बोरुडे ( वय ३० ) यांची बालमटाकळी शिवारातून चार-पाच जणांनी बोलेरो जीप गाडीतून जबरदस्तीने अपहरण केल्याची शेवगाव पोलिसात तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी सपोनी आशिष शेळके यांचे समवेत पथक तयार करून त्यांना तपास कामी रवाना केले . तपास पथकाने प्रथम गेवराई येथे शोध घेतला.
शुक्रवारी दि. २३ रोजी सकाळी साडेसातचे सुमारास आरोपींनी अपहरित तरुण सोनाजी बोरुडे यांचे चुलत भावाचे मोबाईलवर सोनाजी बोरुडे यास जबरदस्तीने चार-पाच लाख रुपये तयार ठेवा असा निरोप द्यायला भाग पाडले. तेव्हा गुन्ह्याचे वाढते गांभीर्य लक्षात घेऊन संभाषण झालेल्या मोबाईलचे लोकेशन वरून पथकास प्रथम जेजुरी भागात तपास करण्यास सांगितले. त्यानंतर मोबाईल लोकेशन बदलल्याने पथकास बारामती पोलीस स्टेशन हद्दीत सापळा लावण्यास सुचविले.
तपास पथकाने त्याप्रमाणे सापळा लावून भगवान प्रल्हाद ठोसर (वय३६ रा. सिंदखेड तालुका गेवराई ), कैलास केरुजी धरंधरे (वय ५० रा. साठे नगर गेवराई ),जीवन प्रकाश करांडे (वय ३०, रा. शिंदखेड तालुका गेवराई ), बाळासाहेब भास्कर करांडे (वय ५० रा. मोटे गल्ली गेवराई ) व ज्ञानेश्वर भगवान कांबळे (वय २७ रा. साठे नगर गेवराई ) यांना अपहरण केलेल्या सोनाजी बोरुडे यांचे सह त्यांनी वापरलेल्या बोलेरो जीप क्रमांक एम एच २३ इ ९७१३ सह शिताफिने ताब्यात घेतले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर संदीप मिटके व शेवगाव उपविभागाचे प्रभारी तथा पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी आशिष शेळके, स. फौ.भगवान बडधे, राजेंद्र ढाकणे संभाजी धायतडक, वासुदेव डमाळे यांचे पथकाने अल्पावधीत यशस्वी पार पाडली. त्याबद्दल शेवगाव पोलीस ठाण्याचे कौतुक होत आहे.