शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानात आज विधिवत घटस्थापना करुन शारदीय नवरात्रोत्सवास मोठया उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
गेल्या दोन वर्षात कोविडमुळे असलेले निर्बंध उठल्यामुळे नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी भाविकांच्या आनंदाला उधाण आले आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होणार असल्याचे संकेत आहेत.
येथील घटस्थापनेसाठी भाविकांनी श्री क्षेत्र माहूर गडहून पायी ज्योत आणली. काल रविवारी तीचे तालुक्यात आगमन होतांना ठिकठिकाणी स्वागत झाले. शेवगावात सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र बागूल, श्रीमंत घुले आदि मान्यवरांनी क्रांती चौकातील पावन गणपती मंदिराच्या प्रांगणात ज्योतीचे स्वागत केले. तर अमरापूरच्या देवस्थानात श्री रेणुका भक्तानुरागी डॉ. प्रशांत नाना भालेराव यांनी सर्वांना महावस्त्रे देऊन स्वागत केले. देवस्थानचे पुजारी तुषार देवा यांनी पायी ज्योत आणणाऱ्या भाविकांची पाद्य पूजा केली.
वेदशास्त्र संपन्न सच्चिदानंद देवा व त्यांच्या ब्रह्म वृंदानी आज सकाळी आई साहेबांना पुण्याहवाचन , मातृका पूजन, महारुद्र अभिषेक व सुवर्णालंकार घालून विधिवत घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर आईसाहेबांना पायसचा नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली तसेच शतचंडीयागास प्रारंभ करण्यात आला. मंदिराच्या सभागृहात दिवसभर संगित राजोपचार चालू होता.