ताजनापूर उपसा जलसिचन योजनेद्वारे चापडगाव व प्रभुवाडगावचे बंधारे भरावेत

शेवगाव प्रतिनिधी, दि.१३ :  ताजनापूर उपसा जलसिचन योजनेद्वारे चापडगाव व प्रभुवाडगावच्या नद्या वरील बंधारे भरावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते संतोष धोंडिराम गायकवाड व परिसरातील शेतकऱ्यांनी एका निवेदना द्वारे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचेकडे केली असून तातडीने कार्यवाही झाली नाही, तर परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने दि.५ फेबुवारी पासून चापडगाव येथे बेमुदत साखळी उपोषण आंदोलन करण्याचा निर्धार जाहीर केला आहे.

गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तागनापूर टप्पा क्रमांक दोनच्या टाकीचे काम पूर्ण होऊन चाचणी द्वारे योजनेचे पाणी चापडगाव कुंडापर्यंत पोहचले आहे. ते पाणी चापडगावच्या नदीत सोडल्यास परिसरातील ७-८ व प्रभू्वाडगाव शिवारातील ४-५ बंधारे भरून जवळपासच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.

सध्या तालुक्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असून पाणी टंचाई आतापासून भेडसावू लागली आहे. ताजनापूर योजना कार्यान्वित होण्यासाठी अद्याप वेळ असल्यामुळे येत्या ८-१० दिवसात परिसरातील बंधारे भरून दिले तर उन्हाळी पिकांनाही लाभ मिळणार आहे. या संदर्भात परिसरातील शेतकऱ्यानी मागील महिन्यात रास्ता रोको आंदोलन करून संबंधितांचे लक्ष वेधले असता. त्यावेळी काही काळ पाणी सोडण्यात आल्याने सर्व बंधारे भरले गेले नाहीत.

यावेळी सर्व बंधारे भरल्या शिवाय पाणी बंद करण्यात येवू नये अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती तहसीलदार ताजनापूर कनिष्ठ अभियंता यांच्या सह सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, गणेश गोरे, मच्छिंद्र तेलोरे, सोमनाथ नेमाणे, दिपक गायकवाड, भिमा नेमाणे यांचे सह शेतकरी उपस्थित होते.