कोपरगांव प्रतिनिधी, दि. २७ : सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी संघर्ष, संकटे आव्हाने समर्थपणे पेलुन सहकारी साखर कारखानदारी टिकवून ठेवली इतर कारखान्यांच्या तुलनेत संजीवनीने आजपर्यंत उसाला कधीही कमी भाव दिलेला नाही यावर्षीही सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना भावात मागे राहणार नाही असे प्रतिपादन अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी केले. केंद्र शासनाने एफआरपीची रक्कम ज्याप्रमाणे वाढविली त्याप्रमाणात साखर विकीच्या दरातही वाढ करावी तरच सहकारी साखर कारखानदारी टिकेल असेही ते म्हणाले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची साठावी वार्षीक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर सोमवारी पार पडली त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासद शेतक-यांना श्रध्दांजली वाहण्यांत आली. शरद पोपटराव शिंदे आडसाली (शहा सिन्नर), बाळासाहेब माधवराव संधान पूर्व हंगामी (दहिवडी सिन्नर), पुंडलिक आनंदा गिते सुरू (संवत्सर), व एकनाथ कचरू गवांदे खोडवा (लक्ष्मणपुर सिन्नर), या सर्वाधिक उस उत्पादन घेणा-या शेतक-यांचा सत्कार करण्यांत आला. उपाध्यक्ष रमेश घोडेराव सर्व संचालक व कार्यकारी संचालक यांनी सभासदांचे स्वागत केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय टाळयांच्या गजरात मंजुर करण्यांत आले. मागील सभेचे इतिवृत सचिव तुळशीराम कानवडे यांनी वाचले त्यास सभासदांनी मंजुरी दिली..
श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेती आणि शेतकरी डोळयासमोर ठेवुन त्यांच्या उत्कर्षासाठी सातत्याने प्रयत्न केले त्यांची विचारधारा आपण पुढे अशीच चालवुन उत्कर्ष साधु आज सहकारासमोर खाजगीचे आव्हान आहे, अतिरिक्त साखर उत्पादन, उसतोडणी कामगारांची कमतरता यासह असंख्य नव नविन प्रश्न साखर कारखानदारीसमोर निर्माण झाले आहेत त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घेवुन उस तोडणी यंत्र खरेदीस तसेच औषधी व प्रायोगीक प्रकल्प, संशोधन व विकासासाठी अनुदान द्यावे.
भविष्यात उस वाहतुक करणा-या वाहनांचा खर्च कमी करण्यासाठी कारखाना बायो सी एन जी साठी प्रयत्नशिल आहे. घरगुती व उद्योगासाठीच्या साखरेचे दर वेगवेगळे ठरवावेत. साखर कारखानदारीकडे हंगामी उद्योग म्हणून पाहिले जाते मात्र त्याकडे वार्षीक उद्योग कसा होईल यासाठी सर्वाना प्रयत्न करावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सकारात्मक धोरणामुळे मागील हंगामात भारत सर्वाधिक उत्पादन व निर्यात करणारा देश ठरला आहे. चालुवर्षीही देशात ३५५ लाख मेटन विक्रमी साखरेचे उत्पादन होणार असल्याने साखर निर्यातीबाबतचे धोरण आजच जाहिर करून साखर कारखानदारीला दिलासा द्यावा.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाला जोड देत शेतक-याला सर्वाधिक उत्पादन कसे मिळेल यासाठी असंख्य प्रकल्प बेधडकपणे राबविले. त्यांचे हेच धोरण आम्ही सर्व संचालक मंडळाने कायम ठेवुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना उसावरील कीड त्यावरील उपाययोजना, उसाची परिपक्वता वाढ व रवेज, आदि माहिती अत्याधुनिक सॅटेलाईट तंत्रज्ञानातुन ई कृषि ॲपच्या माध्यमांतुन सभासद शेतक-यांना उपलब्ध करून देवुन देशातील पहिल्या दहा सहकारी साखर कारखानदारीत कोल्हे कारखाना स्थान मिळविल अशी ग्वाही त्यांनी दिली. कोपरगांव तालुक्यात ड वर्ग घरकुल लाभापासून अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचा समावेश पुन्हा करून दिल्याबददल कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचा यावेळी सत्कार करण्यांत आला. सुत्रसंचलन व आभार संचालक विश्वासराव महाले यांनी केले.
जिरायत भागातील शेतक-यांना निळवंडे धरणाचे पाणी कालव्याद्वारे मिळावे यासाठी भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे या मंत्रालयात बैठकीसाठी गेल्या असुन येत्या डिसेंबर-जानेवारी पर्यंत शेतक-यांच्या शेतात पाणी पोहोचण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे असे विवेक कोल्हे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे सहकारी साखर कारखानदारीतील योगदान लक्षात घेवुन त्यांचा पुर्णाकृती पुतळा कारखाना कार्यस्थळावर उभारण्यात यावा अशी सुचना ऐनवेळच्या विषयात आप्पासाहेब औताडे व रमेश औताडे यांनी केली त्यास सर्व सभासदांनी हात उंचावुन संमती दिली.