विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिक्षण घेत नाव कमवावे – डॉ. दत्तात्रय मुळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४: आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत, सामाजिक सेवाभावी संस्था संघटना मदत करतात तरीही काही कमतरता भासत असेल तरीही विद्यार्थ्यांनी जिद्दीने, ध्येयाने शिक्षण घेऊन यशोशिखर गाठावे, थोडे कष्ट घेतले तर यश संपादन केले जाते, असे विचार हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय मुळे यांनी व्यक्त केले.

जेष्ठ नागरिक सेवा मंच, जेष्ठ महिला समितीच्या वतीने कोपरगाव नगरपालिका शाळा नंबर एक मधिल विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य व फळ वाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सौ सुधा भाभी ठोळे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून हृदयरोगतज्ज्ञ डॉ दत्तात्रय मुळे, सौ. मुळे, उद्योजक दिलीप वाबळे होते.

या प्रसंगी दिलीप वाबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थी मेहनती, जिद्दी, आज्ञाधारक असावा. शिक्षकांच्या शिकविण्याकडे लक्ष देत आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. जेष्ठ नागरिक सेवा मंच जेष्ठ महिला समितीच्या वतीने आजतागायत अनेक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. त्याचे सार्थक झाले पाहिजे.

स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ तरवडे ( बिबवे ) यांनी केले. जेष्ठ नागरिक संघाच्या कार्याचा आढावा जेष्ठ महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी यांनी सादर केला. उत्तमभाई शहा यांनी उपक्रमाची माहिती दिली. शैक्षणिक साहित्य प्रदान समारंभ प्रसंगी मंचचे कार्याध्यक्ष विजय बंब, डॉ. विलास आचारी, साहित्यिक हेमचंद्र भवर, शाळेच्या शिक्षिका, शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य, खाऊ मिळाल्याने विद्यार्थ्यांना आनंद झाला होता.