कोपरगांव प्रतिनिधी, दि. ७ : तालुक्याच्या परिसरामध्ये काही खाजगी खेडा खरेदी व्यापारी काटे उभारुन
बाजार समितीचा परवाना न घेता अवैधपणे शेतकऱ्यांच्या घरी जाऊन शेतमालाला जादा भाव देण्याचे आमिष दाखवुन आर्थिक अडचणींचा फायदा घेऊन आर्द्रता मशिन मध्ये हातचलाखी करुन वाळलेली सोयाबीन, मका यांची आर्द्रता जास्त़ व प्रतवारी कमी असल्याचे भासवुन शेतक-यांची फसवणुक करत आहेत असे बाजार समितीच्या निदर्शनास येत असुन कोपरगाव बाजार समितीने अशा व्यापा-यांवर कारवाई सुरु केली आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमालाला चांगला भाव मिळण्याकरीता कोपरगांव बाजार समितीच्या मुख्य़ आवारात विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, कोपरगांव नामदेव गोरक्षनास ठोंबळ यांनी केले आहे.
बाजार समितीमध्ये उघड लिलावाचे बोलीने सर्व धान्याचे लिलाव होत असल्यामुळे शेतक-यांचे शेतमालाला चांगले भाव मिळतात, बाजार समितीमध्ये हमाली व तोलाई वगळता शेतक-यांच्या काटा पट्टीत कुठलिही कपात केली जात नाही या
व्यतीरीक्त़ त्यांना पैशाची हमी आहे. असे बाजार समितीचे सचिव श्री. एन. एस. रणशुर यांनी सांगितले. खेडा खरेदी व्यापारी शेतक-यांच्या मालाचे वजनमाप करतांना इलेक्ट्रॉनिक वजनकाटयात ॲडजेस्ट़मेंट करुन काटा करतात व शेतक-यांची आर्थिक लुट करतात त्यामुळे शेतकरी वर्गात एकच संताप व्यक्त़ केला जात आहे. यामुळे कोपरगांव बाजार समितीने फिरते पथक तयार केले असुन अशा व्यापा-यांवर कारवाई केली जाणार आहे.
सविस्त़र माहिती अशी की तालुक्यात यावर्षी सततच्या पावसामुळे शेतक-यांची सोयाबीन, मका, कापुस, मुग या पिकाची मोठी हानी झाली असुन उत्प़न्नात घट झाल्याचे दिसुन येत आहे. सोयाबीन, मका या पिकाची काढणी सुरु असल्याने मजुरांना देण्यासाठी व रब्बी पिके उभे करण्यासाठी शेतक-यांना पैशाची गरज आहे. शेतक-यांच्या या अडचणींचा फायदा घेवुन खाजगी व्यापारी आर्द्रता मोजण्याच्या मॉईश्चर मीटर मध्ये तांत्रिक बिघाड करुन वाळलेली सोयाबीन आर्द्रता जास्त़ दाखवुन प्रतवारी कमी असल्याचे भासवुन वजनमापात 2 ते 5 किलो पर्यंत काटा मारुन शेतकरी वर्गास फसवत आहे.
शेतक-यांची लुट थांबवावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन केली जात आहे. अशा व्यापा-यांवर कारवाई करणेकरीता बाजार समितीने पथक नियुक्त़ केले आहे. तसेच शेतकरी बांधवांनी शेतमाल विकत असतांना व्यापा-यांकडुन हिशोब पट्टीची
प्रत घ्यावी त्यामुळे शेतक-यांना भविष्यात शासनाकडून अनुदान योजनेचा फायदा घेता येईल या दृष्टीने कोपरगाव बाजार समितीच्या आवारात भुसार, सोयाबीन विक्रीस आणवा असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, कोपरगांव नामदेव गोरक्षनाथ ठोंबळ व बाजार समितीचे सचिव एन. एस. रणशुर यांनी शेतक-यांना केले आहे.