पढेगावमध्ये मराठा आरक्षण समर्थनार्थ कॅन्डल मोर्चा

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०२ : तालुक्यातील पढेगाव येथील सकल मराठा समाजाच्या बांधवांनी मागील आठवड्यात एकत्र येत पढेगावात कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांना अथवा राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना गावबंदी करत मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण मागणीला पाठिंबा दर्शवत तसा फलक लावुन गावात जनजागृती करण्यात आली होती.

त्यापाठोपाठ बुधवार दि. १ नोव्हेंबरपासुन सकल मराठा समाजाने साखळी उपोषण सुरु केले असुन, रात्री ७ वाजता गावातील सकल मराठा समाजाने एकत्र येत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीच्या समर्थनार्थ संपूर्ण गावात भव्य स्वरूपात कॅण्डल मार्च काढला. यावेळी घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून सोडत शासनाने लवकर मराठा आरक्षण संबंधी निर्णय घ्यावा. अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झालेल्या अनेक मराठा युवकांनी दिला.

शासनाविरोधातील आपल्या तीव्र भावना व्यक्त करत, मराठा आरक्षणाचा समर्थनार्थ पढेगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित या कॅण्डल मोर्चमध्ये मोठ्या संख्येने गावातील लहान मुले, महिला, मराठा समाज बांधव सहभागी झालेले होते.