खास पिशव्यांच्या ४२ हजार २४३कीटचे होणार वाटप
शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : सर्व सामन्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘आनंदाचा शिधा’ या अभिनव उपक्रमाच्या ४२ हजार २४३ कीट शेवगाव तालुक्यात पोहचल्या असून तालुक्यातील काही रेशन दुकानातून या शिधा वाटपास आज सुरुवात झाल्याची माहिती तहसीलदार छगनराव वाघ यांनी दिली.
शहरातील दादेगाव रस्त्यावरील शासकीय गोदामातून तहसीलदार वाघ, तालुका पुरवठा निरीक्षक विजय चव्हाण, यांच्यासह पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचा-यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी सकाळीच तालुक्याच्या विविध गावात शासकीय वाहनातून ‘आनंदाचा शिधा ‘ योजनेच्या कीट पाठविण्यात आल्या. या किटच्या माध्यमातून गरीब व गरजू शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयात प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चनाडाळ व एक लिटर पामतेल या साहित्याच्या कीटचे वाटप केले जाणार आहे.
शेवगाव तालुक्यात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे लगेच वाटप करण्याच्या सूचना संबधित रेशन दुकानदारांना देण्यात आल्या असून शासनाने दिवाळी पूर्वी आम्हाला आनंदाचा शिधा दिल्याने आमची दिवाळी गोड झाली अशी भावना शिधा मिळालेल्या लाभार्थ्यांनी व्यक्त केल्याची माहिती स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा मीना कळकुंबे, तालुकाध्यक्ष पोपट पाखरे यांनी दिली.
यावेळी रेशन दुकानदारांनी ‘आनंदाचा शिधा ‘ वाटप करतांना शासनाने त्यासाठी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटोसह महाराष्ट्र शासन सर्व नागरिकांना ‘शुभ दिवाळी ‘ अशा ठळक अक्षरात शुभेच्छा दिलेल्या खास पिशवीत भरुन ती कीट देण्याचे आदेश दिले आहेत ! याशिवाय किंमत केवळ १०० रुपये तसेच मशीनवर अंगठा लावतांना आपल्या थैलीत ‘ चार पाकीट ‘ असल्याची खात्री करा अशाही सूचना आहेत !!