कोपरगांव प्रतिनिधी, दि. ७ : परतीच्या पावसाने शेतक-यांच्या खरीप पिकांची अक्षरक्ष: धुळधाण झाली असुन सोयाबीन, मका, कापूस, बाजरी आदि पिक लागवडीसाठी केलेला खर्चही वसुल होणार नाही अशी अवस्था शेतक-यांची झाली आहे, सोयाबीनसह सर्वच पीकक्षेत्र शंभर टक्के बाधीत आहे तेंव्हा प्रशासकीय अधिका-यांनी शेतक-यांच्या हालअपेष्टा समजुन घेवुन त्याच्या पिक नुकसानीचे शंभर टक्के पंचनामे करून त्यास तात्काळ आर्थीक मदत करावी, पीक विमा कंपनीने दुजाभाव न करता फेर पंचनामे करून मदतीची भावना कायम ठेवावी अशी मागणी माजी सभापती मच्छिंद्र टेके यांनी केली, त्याचप्रमाणे समृध्दी महामार्गाच्या कामामुळे शेतक-यांचे २०१८ पासुन सातत्याने नुकसान होत आहे त्याबाबत वारंवार तक्रारी करूनही रस्त्याचे काम करणारे ठेकेदार आणि त्याची जबाबदारी असणारा अधिकारी वर्ग जाणून बुजून दुर्लक्ष करतो आहे तेंव्हा येत्या आठ दिवसात या तक्रारींचे निवारण करावे असा अल्टीमेटम नायब तहसिलदार पी. डी. पवार यांना यावेळी देण्यांत आला.
जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी मतदारसंघवासियांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणुक व्हावी यासाठी तहसिल कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यांत येतो त्यात मच्छिंद्र टेके यांनी शेतक-यांच्या आर्त वेदनांना वाट फोडली. अध्यक्षस्थानी अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान होते.
शिंदे फडणवीस मायबाप सरकार शेतक-यांना मदत करणार आहे मात्र त्यांच्यापर्यंत कोपरगांव विधानसभा मतदार संघातील खरीप पिक शेतक-यांच्या व्यथा निट मांडल्या गेल्या नाही तर शेतक-यांना आगामी रब्बी पिक लागवडी करण्यात अनंत अडचणींना सामोरे जावे लागेल, शेतक-यांचे दुःख अनंत आहे., सोयाबीन पिकात अजूनही गुडघाभर पाणी असून मजुरांचा वाणवा आहे. सलग चार वर्षापासून शेतकऱ्यांना खरीप हंगामात अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे, वातावरण बदलाचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी, तर कधी नैसर्गीक संकटाला त्याला तोंड द्यावे लागते. प्रशासकीय यंत्रणेकडे हेलपाटे मारून त्याच्या अंगात त्राण रहात नाही तेंव्हा अशा परिस्थितीत प्रशासनाने त्याच्या भावनांचा उद्रेक होणार नाही याची काळजी घ्यावी.
याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी आचलगांव बोलकी शिवरस्ता, अमृत संजीवनीचे पराग संधान यांनी शहर घरपटटीचे चुकीचे सर्व्हेक्षण करणा-या कंपनीला काळया यादीत टाकुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाही याबाबत प्रांताधिकारी तहसिलदार यांनी लेखी आश्वासन देवुनही अजुनही कार्यवाही का होत नाही, त्याचप्रमाणे कोरोनामुळे मयत झालेल्या रूग्णांच्या वारसांना पन्नास हजार रूपये मदतीचे तात्काळ वाटप व्हावे.
भाजपाचे सरचिटणीस दिपक चौधरी यांनी शेतक-यांनी पिक विमा काढला पण त्यांना अत्यल्प नुकसान भरपाई मिळाली आहे तेंव्हा खरीपनुकसानीचे फेर पंचनामे व्हावे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात यांनी नागपुर मुंबई समृध्दी महामार्गांचे ठेकेदार काम करतांना शेतक-यांच्या अडचणी सोडवत नाही, शेतातील पावसाच्या पाण्याचा अजुनही निचरा होत नाही, भरावाचा खळगा शेतात वाहुन येवुन जमिनी नापिकी होत आहे. पुर्वीच्या पाटपाण्याच्या चा-या उपचा-या नादुरूस्त झाल्या आहेत त्या पुर्ववत करून मिळत नाही. शहराध्यक्ष दत्ता काले यांनी शहरासह विविध उपप्रभागातील नागरी समस्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करते, दिपक जपे यांनी खडकी प्रभागात ऑक्टोंबरच्या अतिवृष्टींमुळे असंख्य रहिवास क्षेत्रातील घरामध्ये पाणी घुसन नुकसान झाले मात्र त्याचे पंचनामे अजुनही केले जात नाही.
भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी पोहेगांव टप्यातील ११ गावात असंख्य लाभार्थ्यांना शासनाच्या विहीर योजना मंजुर आहे त्याचे कार्यारंभ आदेश तात्काळ द्यावेत, डाउच येथे सामाजिक सभागृहाच्या जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढावे, बाजार समितीचे माजी सभापती अंबादास पाटोळे यांनी आपेगांव स्मशानभुमी त्याचप्रमाणे ग्रीन झोनमुळे आदिवासी बांधवांना विहीर योजनांचा लाभ मिळत नाही तो तात्काळ मिळावा, शहापुर स्मशानभूमिची चुकीची नोंद लागली आहे ती दुरूस्त व्हावी. प्रकाश भाकरे यांनी कान्हेगांव परिसरातील पाटपाण्याच्या चा- या समृध्दी महामार्गाच्या कामामुळे बाधीत आहे त्या दुरूस्त व्हाव्यात, दुबार व नविन शिधापत्रिका स्टेशनरी अभावी लाभार्थ्यांना मिळत नाही त्याची व्यवस्था व्हावी, भिमा संवत्सरकर यांनी शिंगणापुर परिसरात रस्ता साईडगटार कामाबाबत तक्रारी मांडल्या. जितेंद्र रणशुर यांनीही मनेगांव येथील मागासवर्गीयांवर होणारा अन्याय दुर करावा आदि तक्रारी मांडल्या. याप्रसंगी सर्वश्री. कैलास राहणे, स्वप्निल निखाडे, वैभव आढाव, कृषि विभागाचे श्री. सोनवणे, पालिकेचे ज्ञानेश्वर चाकणे यांच्यासह विविध गांवचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठया संख्येने हजर होते. शेवटी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी आभार मानले.