शेवगाव प्रतिनिधी, दि. ७ : सध्या जनावराच्या लम्पी साथ रोगाने थैमान घातल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून लम्पीला रोखण्यासाठी रोज नवीन उपक्रम पुढे येत आहेत. आज सोमवार दि.७ नोव्हेबर ते १० डिसेंबर या कालावधीत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गावोगाव ‘ माझा गोठा, स्वच्छ गोठा ‘ मोहीम राबविण्यास सुरवात झाली आहे. या संदर्भात पशुपालकांकरिता मोहिमा सुचवा मात्र त्याबरोबर थोडं अंतर्मूख होऊन शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने कोणत्या अवस्थेत आहेत हे पहाणे योग्य होईल. अनेक ठिकाणचे पशुवैद्यकीय दवाखाने अत्यंत अस्वच्छ असून त्या परिसरात चूकून फिरकणाऱ्या सुदृढ जनावरालाही लम्पीची लागण होईल अशी स्थिती आहे.
या संदर्भात प्रातिनिधीक स्वरुपात तालुक्यातील बोधेगाव येथील प्रथम श्रेणीतील पशुवैद्यकीय दवाखाना नमुना म्हणून पहाण्यासारखा आहे. त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. सध्या या इमारतीच्या शेजारी गटारीचे पाणी सांचले आहे , परिसर शेवाळाच्या घाणीने वेढला आहे. त्यावर डांस व कीटकांचे थवेच्या थवे पसरले आहेत. अशी अवस्था असणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्यांची स्वच्छता अगोदर होणे अपेक्षित आहे. अन्य ठिकाणच्या अनेक पशुवैद्यकीय दवाखान्याची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. जनावरांमधील लम्पी रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाचे याबाबत अक्षम्य दूर्लक्ष झाले असल्याने परिसरातील पशुपालकांची नाराजी आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगावसह दोन्ही अंतरवाल्या, सुळे पिंपळगाव, चेडेचांदगाव , आधोडी , शोभानगर, शिंगोरी अशा आठ गावांच्या परीसरासाठी तसेच अंतर्गत वामन वस्ती, मारुती वस्ती, एक बुरुजी वस्ती, काळोबा वस्ती , अकोलकर वस्ती, लमाण तांडा आदी सहा वाड्यावस्त्यांसाठी हा पशुवैद्यकीय दवाखाना आहे.
गेल्या दीड वर्षापासून या पशुवैद्कीय दवाखान्यात कायम स्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने परिसरातील पशुधनाची आवस्था रामभरवसे बनली होती. सध्या या दवाखान्याच्या परिसरात गटारीचे साम्राज्य तयार झाले आहे. गेल्या काही दिवसापासून तालुक्यात जनावरावरील लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच काही जनावरे मृत्युमुखी पडल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यासह तालुक्यात लम्पीला रोखण्यासाठी आज सोमवार दि.७ नोव्हेंबर पासून ते १० डिसेंबर या कालावधीत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गावोगाव माझा गोठा, स्वच्छ गोठा ही अभिनव मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच विविध उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन मधून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत ,अशा अस्वच्छ , दुर्लक्षित पशुवैद्यकीय दवाखान्याची स्वच्छता अगोदर करून घ्यायला हवी .