गुरू नानक देव यांच्या जयंतीनिमित्त बिपीनदादा कोल्हे यांची गुरुद्वारा येथे भेट

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ :  राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, मानवता आणि शांततेचा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक देवजी यांची ५५३ वी जयंती (८ नोव्हेंबर) कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त कोपरगाव शहरातील गुरुद्वारामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी गुरुद्वारा येथे भेट देऊन पवित्र ‘श्रीगुरू ग्रंथसाहिब’चे मनोभावे दर्शन घेतले आणि शीख बांधवांना गुरू नानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

            याप्रसंगी मनिंदरसिंग खालसा, सेवासिंग सहाणी, कुक्कुशेठ सहाणी, जितेंद्रसिंग सारडा, विनोदशेठ ठकराल, राजूशेठ शिरोडे, संजीवनी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले, भाजपचे न.प. तील माजी गटनेते रवींद्र पाठक, भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, भाजयुमोचे माजी शहराध्यक्ष वैभव आढाव, रिपाइं (आठवले गट) चे प्रदेश सचिव दीपक गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, सतीश रानोडे, देवराम पगारे, राजेंद्र बागुल, प्रशांत कडू, सागर जाधव, खालिकभाई कुरेशी, विक्की मंजूळ, शंकरराव बिऱ्हाडे, संजय तुपसुंदर, गोरख देवडे, महंमदभाई शेख आदींसह संजीवनी उद्योग समूह तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शीख समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  गुरु नानकदेवजी यांनी शीख धर्माची स्थापना केली. शीख धर्मात दहा गुरु होते आणि गुरुनानक देवजी हे शीख समाजाचे पहिले गुरु होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले. मानवतावादावर दृढ श्रद्धा असलेले, जात-धर्म यापलीकडे जाऊन एकतेची शिकवण आणि ‘कलि महि राम नाम सारु’चा उपदेश देणाऱ्या गुरू नानकदेव यांनी परमेश्वर एक आहे आणि चराचरात त्याचे वास्तव्य आहे. आपला कर्ता, धर्ता आणि पिता सारे काही तोच आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाशी प्रेमपूर्वक भावनेने वागले पाहिजे, असा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला.

           दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला गुरू नानकदेव यांची जयंती साजरी करण्यात येते. गुरू नानक जयंती हा दिवस गुरू पर्व, प्रकाश पर्व तसेच गुरू पूरब म्हणूनही साजरा करण्यात येतो. कोपरगाव शहरात शीख समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने राहतात. कोपरगावच्या बाजारपेठेत शीख समाजाचे मोलाचे योगदान आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शिख समाजाची सुख दुःखे जवळून पाहून त्यांच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न केले. या समाजानेही कोपरगाव पंचक्रोशीच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे असे ते म्हणाले.