आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाका – पराग संधान

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : कोपरगाव शहरातील मालमत्ताधारकांचे चुकीचे सर्वेक्षण करून मालमत्ताधारकांवर वाढीव घरपट्टीचा बोजा लादणाऱ्या नागपूरच्या आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचे लेखी आश्वासन प्रांताधिकारी गोविंद शिंदे आणि तहसीलदार विजय बोरुडे यांनी देऊन दोन महिने उलटले तरीही अद्याप त्याबाबत कारवाई का होत नाही, असा सवाल अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यासंदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Mypage

               कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी कोपरगाव येथील तहसील कार्यालयात जनता दरबार आयोजित केला जातो. त्यात पराग संधान बोलत होते.

Mypage

           ते पुढे म्हणाले की. आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीने कोपरगाव शहरातील मालमत्ताधारकांचे चुकीचे सर्वेक्षण केलेले असतानाही नगर परिषद प्रशासनाने सन २०२२-२३ साठी घरपट्टीमध्ये भरमसाठ वाढ करून मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसा बजावल्या. ही अन्यायकारक घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणी करावी, मालमत्तांचे चुकीचे सर्वेक्षण करणाऱ्या आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला नगर परिषदेने दिलेले ७५ लाख रुपये परत घ्यावेत, या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करून काळ्या यादीत टाकावे आदी मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) च्या वतीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर २७ सप्टेंबरपासून चार दिवस साखळी उपोषण केले.

Mypage

           भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे या स्वत: चौथ्या दिवशी या उपोषणात सहभागी झाल्या. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार विजय बोरुडे यांच्याशी चर्चा करून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निर्देश दिल्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी वाढीव घरपट्टीला स्थगिती दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते. 

Mypage

            त्यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे व आणि तहसीलदार विजय बोरुडे यांनी कोपरगावातील मालमत्तांचे चुकीचे सर्वेक्षण करणाऱ्या आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला नगर परिषदेने दिलेले ७५ लाख रुपये परत घेणे, या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून कंपनीला काळ्या यादीत टाकणे आदी मागण्यांबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते; परंतु दोन महिने उलटूनही अद्याप या प्रकरणात काहीही कार्यवाही झालेली नाही. प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी उपोषणकर्त्यांना दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. यासंदर्भात प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी संधान यांनी केली.

Mypage

          कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरण कामासाठी ११ जून २०२१ रोजी ठेकेदारास कार्यारंभ आदेश दिलेला आहे. बारा महिन्यांत हे काम पूर्ण करावयाचे आहे; पण दीड वर्षे उलटूनही ठेकेदाराने अद्याप हे काम सुरू केलेले नाही. कुणाच्या राजकीय दबावाखाली येऊन हे काम रखडवण्यात आले आहे, असा सवाल संधान यांनी उपस्थित केला. या कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Mypage

              कोपरगाव शहरात १९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीने खडकी, गोकुळनगरी, निवारा, कर्मवीरनगर, ब्रिजलालनगर, संजयनगर, सुभाषनगर आदी भागात अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे अतोनात नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या काळात नागरिकांवर अस्मानी संकट कोसळले. भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व नागरिकांनी वारंवार मागणी करूनही नगर परिषद प्रशासनाने या परिसरात साचलेले पावसाचे पाणी उपसण्याकडे व नुकसानीचे पंचनामे करण्यास दिरंगाई केली. नगर परिषद प्रशासनाचा हा चालढकलपणा कशासाठी? न. प. प्रशासन कुणाच्या इशाऱ्यावर असे करत आहे? दरवर्षी पावसाळ्यात खडकी, गोकुळनगरी, कर्मवीरनगरसह शहराच्या अनेक भागात पावसामुळे मोठे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी संधान यांनी केली.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *