जिल्ह्यात तयार होणार ५०० आपदा मित्र प्रशिक्षणास सुरूवात
कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : आपत्तीच्या काळात मानवतेच्या दृष्टीकोनातून केलेली मदत समाजाला एकसंघ ठेवण्याचे काम करते. असे प्रतिपादन कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी केले.
नवी दिल्लीच्या राष्ट्रीय व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने आयोजित ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमात आयोजित करण्यात आला आहे. २६ डिसेंबर २०२२ ते ६ जोनवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या १२ दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कोकमठाण येथील आत्मा मलिक ध्यानपीठ येथे सुर्यवंशी यांच्या हस्ते
करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा आप्पती व्यवस्थापन अधिकारी डॉ.विरेंद्र बडदे, अहमदनगर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी शंकर
मिसाळ, शिर्डीचे माहिती अधिकारी सुरेश पाटील, ‘यशदा’ पुणेचे मास्टर ट्रेनर योगेश परदेशी, कादर महाजन गिरिष उपाध्याय, लखन गायकवाड, राहूल शिरसाठ आदी यावेळी उपस्थित होते.
सुर्यवंशी पुढे म्हणाले की, आपत्तीच्या काळात तरूण, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आपल्यातील संवेदनशील भावना जागृत ठेवत प्रसंगी जीवावर उदार होऊन साहस दाखवत मदत करतात. मानवतेच्या दृष्टीकोनातून झालेल्या अशा
मदतीमुळे समाज एकसंघ राहण्याचे काम होत असते.
प्रास्ताविकात श्री.बडदे ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती देतांना म्हणाले की, दिल्लीतील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून राज्यातील २० जिल्ह्यामध्ये प्रत्येकी ५०० आपदा मित्रांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यात ५०० आपदा मित्र तयार करण्याचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ५० तरूणांना १२ दिवसाचे निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम ५०० आपदा मित्र प्रशिक्षित होईपर्यंत निरंतर सुरू राहणार आहे.
या प्रशिक्षणात भुकंप, त्सुनामी, महापूर, बॉम्बस्फोट, रस्ते अपघात, जंगली प्राण्यांचे रेस्क्यु इत्यादी विषयावर सविस्तर माहिती व बचाव करण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भविष्यात आपदा मित्रांची जबाबदारी महत्वाची राहणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र, लाईफ जॅकेट, बॅटरी, दोरखंड रेक्स्यु बॅग, आपदा मित्र म्हणून ओळखपत्र दिले
जाणार आहे. असेही श्री.बडदे यांनी सांगितले.
आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचला आपदा मित्रांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अजय देसाई यांनी केले. आभार आपदा मित्र प्रशिक्षणार्थी सुशांत घोडके यांनी मानले.