शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : शेवगावच्या भरवस्तीतील व बस स्थानकाच्या प्रवेशदारातील क्रांती चौकात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या जुगाडातील एका ट्रॉलीचा आज दुपारी बाराच्या दरम्यान अचानक अॅक्सल तुटला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र शेतकऱ्याच्या टन -दीड टन उसाचे रस्त्यावर पडून नुकसान झाले.
सुमारे तीन-साडेतीन तास मोठी वाहतूक कोंडी झाली. शेवगाव-पाथर्डी मिरी, शेवगाव -पैठण ,शेवगाव – नेवासे रस्त्यावर दीडएक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडीने बस स्थानकाचे प्रवेश दारच बंद झाल्याने या वेळेत सुटणाऱ्या अनेक एसटी गाड्या अडकून पडल्या. दुपारी साडेतीन नंतर वाहतूक सुरळीत झाली.
शेवगाव परिसरात ज्ञानेश्वर, गंगामाई ,केदारेश्वर, वृद्धेश्वर या साखर कारखान्यांच्या बहुतेक ट्रॅक्टरला दोन दोन ट्रॉल्याचे जुगाड लावून ऊस वाहतूक केली जाते. ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरला अशा पद्धतीने सजवतात की त्याला पुढील रस्ता नीट दिसतो का ? याबद्दल साशंकता आहे. या जुगाडामुळे अनेकदा अपघात होऊन जीवितहानी झालेली आहे. त्यामुळे जुगाड लावून होणारी ऊस वाहतूक शहरातून होऊ नये अशी नागरिकांची सातत्याने मागणी असताना कोणीही ती गांभीर्याने घेत नाही.
अनेकदा हे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रॉल्या विनाक्रमांकाच्या असतात. आज झालेल्या अपघातातील ट्रॅक्टर व ट्रॉल्या सुद्धा विना क्रमांकाच्या आहेत. उसाच्या ट्रॉलीला मागील बाजूने रिफ्लेक्टर नसतात. चालक मोठ्या आवाजात गाण्याच्या कॅसेट लावून त्याच्याच धुंदीत ट्रॅक्टर चालवीत असतात. या संदर्भात कारखाने चालू होताना केवळ एखादे कागदी फर्मान काढले जाते. मात्र त्याची अंमलबजावणी आरटीओ वा पोलिस खात्याकडून होत नाही हे दूर्दैव आहे.