चोरट्यांनी लुटले ३० लाखांचे घड्याळं

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : कोपरगाव शहरातील अतिशय रहदारीच्या व मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गुरुद्वारा रोड येथील सचिन वाॅच हे घड्याळाचे दुकान चोरट्यांनी फोडून रोख रक्कम शेकडो घड्याळासह  ३० लाखांचा मुद्देमाल लुटल्याची घटना राञी घडली.

 शहरातील भाजी मार्केटजवळील सचिन वाॅच कंपनी हे घड्याळ्याचे दालन अज्ञात सात ते आठ चोरट्यांनी दि. १९ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास शटर उचकटून फोडले. चोरट्यांनी साडे तीन लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह  ३० लाखाचा मुद्देमाल चोरी गेला आहे. घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील मध्यवर्ती भाजी मार्केट जवळ असणारे सचिन वाॅच हे लोहाडे (जैन) बंधूंचे  नामांकित, ब्रांडेड कंपन्यांचे व महागडे घड्याळांचे दालन आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते याच व्यवसायात आहेत. १९ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सात ते आठ चोरटे एकत्र आल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे.

दोन चोरटे दुकानाच्या पायरीवर बसण्याचे नाटक केले. इतरांनी शटर भोवती चादर धरून एकाने शटरला हात लावून ते उचकटून टाकले. चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी सध्या मार्केटमध्ये मागणी असलेले  नामांकित कंपनींचे व महागडे घड्याळे चोरून नेले. कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये संजय लालचंद  जैन  रा. गुरूद्वारा रोड कोपरगाव यांनी फिर्याद दिली आहे.

जैन यांनी सांगितले  की, सचिन वाॅच हे आमचे घड्याळाचे दुकान असुन नेहमी प्रमाणे राञी ९ वाजता बंद करुन गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता  माझा मुलगा सनी जैन हा दुकान उघडण्यासाठी आला असता त्याला दुकानाचे शटर उचकल्याचे दिसले. दुकानात पाहीले असता टायटन, टायमॅक्स सह इतर कंपन्यांचे मिळून २७५ घड्याळे त्यांचे किंमत २५ लाख ७५ हजार रुपये व  दुकानातील रोख रक्कम ३ लाख ४७ हजार असा सरासरी २९ लाख २२ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी  चोरून नेल्याचे सीसीटीव्हीत आढळून आले असे म्हंटले आहे.

घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करुन पुढील तपासाचे चक्र फिरवीत आहेत लवकरच चोरट्यांचा शोध लावणार असल्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितले 

 दरम्यान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी धाडसी चोरी झाल्याने व्यापार्यांमध्ये मोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर, उपनगरात देखील दिवसेंदिवस घरफोडीच्या घटना मध्ये वाढ होत आहे.  एकंदरीत चोरट्यांचे धाडस वाढत चालले आहे. पोलिसांसमोर सचिन वाॅचचे चोरटे पकडण्याचे मोठे आव्हान आहे.

पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन लोहाडे बंधूंची भेट घेतली.  संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. भयभीत नागरिकांना आधार देत उपस्थित व्यापारी वर्गाशी चर्चा केली.  पोलिस प्रशासनाला तातडीने कडक कारवाईच्या सूचना दिल्या. 

पाच ते सहा चोरटे पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान सचिन वाॅच हे दुकान फोडण्यासाठी नामी शक्कल लढवल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहेत. कापडी पडद्याचा आडोसा करुन शटर उघडत आहेत. चोरांना आता सीसीटीव्हीचीही भीती राहीली नाही.