अहमदनगर व बीडच्या खेळाडूंचे संजीवनी युवा प्रतिष्ठानकडून अभिनंदन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०३ :  अहमदनगर ग्रामीणचे जिल्हा पोलीस उपाधीक्षक संपत भोसले यांची कन्या ऋतुजा भोसले हिने चीन येथे सध्या सुरू असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मोलाची कामगिरी करून टेनिस डबल तसेच बीड जिल्ह्यातील लांब पल्याचा धावपटू अविनाश साबळे यांनी स्टीपलचेस क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावून मोलाची कामगिरी केली त्याबद्दल संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

ते पुढे म्हणाले की, चीन येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा भारताला ५० पेक्षा जास्त पदके मिळाली आहेत या सर्व खेळाडूंनी आपली गुणवत्ता दाखवून देत महाराष्ट्र राज्यासह भारत देशाचे नाव उज्वल केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडियाच्या माध्यमातून भारत देशातील क्रीडापटूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे चीन आशियाई क्रीडा स्पर्धेत या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत आपल्या देशाला अनेक पदके मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. या पथकामुळे भारत देशाची प्रतिमा आशियाई क्रीडा प्रकारात चौथ्या स्थानावर आली आहे.

ऋतुजा भोसले ही आपल्या अहमदनगर जिल्ह्याची असल्याने तिचा अभिमान आहे. खेळात सातत्य ठेवले तर कुठलीही अशक्य गोष्ट शक्य होते. बीडचा मराठमोळा धावपटू अविनाश साबळे याने जी मेहनत घेतली ती देखील नावलौकिकास्पद आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व क्रीडामंत्री यांनी महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंसाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत जी मेहनत घेतली ती ला-जबाब आहे असेही विवेक कोल्हे यांनी शेवटी म्हटले आहे.