संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या रकमेत वाढ करावी

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११: शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना सध्या महिना काठी मिळणारी एक हजार रुपयांची रक्कम ही अतिशय तुटपुंजी असल्याने व  वाढत्या महागाईच्या काळात त्या वृद्धाचा त्यातून दवाखान्याचा खर्च देखील भागात नसल्याने योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणा-या मासिक रक्कमेत सहा हजार रुपया पर्यंत वाढ करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन येथील पेन्शन कृती समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले.

      या संदर्भात कृती समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमदार मोनिकाताई राजळे यांची भेट घेतली असता  त्यांनी   संघटनेच्या निवेदनाची दखल घेवून त्यांच्या रास्त मागणी बाबत योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

       या निवेदनात म्हंटले आहे की, वरील दोन्ही योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम ही ग्राहक मूल्य निर्देशक अंकाशी जोडण्यात यावी म्हणजे दर सहा महिन्यानंतर त्यात वाढ होईल. कोविड महामारी संकटाची पार्श्वभूमी लक्षात घेता. यंदाच्या अर्थसंकल्पात या दोन्ही योजनांसाठी पुरेशी आर्थिक तरदूत करण्यात यावी.

सदर योजनांचे लाभार्थी आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत दुर्बल घटक असल्याने त्यांचे वार्षिक उत्पन्न दरवर्षी वाढण्याची शक्यता खूपच कमी असल्याने संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी मिळालेला उत्पन्नाचा दाखला हा पाच वर्षानंतर नुतनीकरण अथवा मुलगा २५ वर्षाचा होवून त्याला नोकरी मिळे पर्यंत ग्राह्य धरण्यात यावा,

दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याबाबतचा सरकारी आदेश रद्द करण्यात यावा, तसेच योजनेच्या लाभासाठी सादर केलेल्या अर्जासोबत जोडलेला उत्पन्नाचा दाखला लाभार्थ्याच्या मृत्यू पर्यंत ग्राह्य धरण्यात यावा, लाभ धारकाच्या अपत्याचे वय २५ ओलांडल्यानंतर मिळणारी पेन्शन बंद होण्याची अट रद्द करण्यात यावी.

कृती समितीचे देविदास हुशार, विठ्ठल मोहिते, किरण भोकरे, दीपक कुसळकर, प्रतिभा गोरडे, छाया डाके, वैशाली जोशी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते व योजनेचे लाभ धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.