कोपरगांव प्रतिनिधी, दि. १६ : अहमदनगर जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या ‘मिशन आपुलकी’ या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत कोपरगांव तालुक्यातील कासली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी दिलेल्या आर्थिक व वस्तु रुपातील सहभागातून शाळेचा कायापालट होण्यास चांगली मदत झाली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शाळांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी तालुकावार संपर्क अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या असून कोपरगांव तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेले जिल्हा शिक्षणाधिकारी तथा संपर्क अधिकारी भास्करराव पाटील यांनी नुकतीच कोपरगांवला भेट दिली.
पंचायत समितीच्या सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात जिल्हा शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांच्यासह गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, गट शिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख, केंद्र प्रमुख विलास भांड, शिक्षक राजेंद्र ढेपले, श्रीमती भोईर, संतोष साठे व इतर शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. कासली शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी लोकसहभागातून जमविलेला सुमारे २५ हजार रुपयाचा निधी कासली जिल्हा परिषदेच्या शाळेची डागडुजी व रंगकामासाठी मुख्याध्यापक रामदास लांघी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
तर कासलीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब मांडवडे यांनी मुलांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी पानवुडी मोटार भेट दिली. युवक कार्यकर्ते सचिन मलिक यांनी राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांच्या प्रेरणेतून शाळेला ५० इंची एलईडी ऑनराईड टी. व्ही. संघ भेट दिला. शाळेसाठी संरक्षण भिंत, प्रवेशद्वार व सुसज्ज ग्रंथालय देण्याचा मानसही सचिन मलिक यांनी यावेळी बोलून दाखविला.
जिल्हा शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांनी मिशन आपुलकी उपक्रमाची माहिती देताना. अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ५६९ शाळा सद्या सुरु आहेत. या सर्वच शाळांना विविध भौतिक सुविधा उपलब्ध करुन ग्रामीण पातळीवरचे शिक्षण अधिक प्रगत व दर्जेदार करण्याच्या उद्देशाने ‘ मिशन आपुलकी ‘ हा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतलेला आहे. यात विविध क्षेत्रात कार्यरत असलेले अधिकारी, शेतकरी, उद्योजक, ग्रामस्थ यांचा लोकसहभाग मिळविण्यासाठी तालुकावार अभियान राबविले जात आहे.
जनतेतूनही या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून प्रत्येक गांवातील तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक या त्रिसुत्रीने आपली जबाबदारी व कर्तव्ये निष्ठेने पार पाडून गांवातील लोकांचा मिशन आपुलकी उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठी परिश्रम घेतले तर ग्रामीण पातळीवरचे शिक्षण अधिक परिपूर्ण व प्रगत होण्यास हातभार लागेल. ग्रामीण भागातील मराठी माध्यमांच्या शाळा कार्यक्षम होण्याच्यादृष्टीने भविष्यात या उपक्रमाची व्याप्ती वाढविली जाणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.
याप्रसंगी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, श्रीमती शबाना शेख यांचीही भाषणे झालीत. कार्यक्रमास शिक्षक, ग्रामस्थ व पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.