दर्शना पवार हिच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करा – स्नेहलताताई कोल्हे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : कोपरगाव येथील संजीवनी उद्योग समुहाचे कर्मचारी दत्तात्रय दिनकर पवार यांची मुलगी दर्शना पवार हिच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करावी, अशी मागणी कोपरगावच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भ्रमणध्वनीद्वारे केली आहे.

दत्तात्रय दिनकर पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून संजीवनी उद्योग समुहात काम करत असून, त्यांची सुकन्या दर्शना पवार (वय २६ वर्षे, रा. कोपरगाव) ही नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) परिक्षेत्र वन अधिकारी (आरएफओ) या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती. या परीक्षेत दर्शना पवार हिने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता व तिची परिक्षेत्र वन अधिकारी (आरएफओ) पदी निवड झाली होती.

दर्शना पवार ही अत्यंत हुशार व गुणी मुलगी होती. पुण्यातील एका संस्थेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभासाठी दर्शना पवार ही ९ जून रोजी कोपरगाव येथून पुण्याला गेली होती. हा सत्कार समारंभ पार पडल्यानंतर ती पुण्याजवळील नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे राहत होती. १२ जून रोजी सिंहगडावर फिरायला जात असल्याचे मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली. दर्शनाने आपल्या कुटुंबीयांनाही याबाबत माहिती दिली होती.

दर्शना हिच्यासोबत तिचा एक मित्रदेखील होता. १२ जूनला दर्शनाच्या कुटुंबीयांनी संपर्क साधल्यावर तिचा मोबाईल बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, तिचा ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीयांनी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रोड पोलिस ठाण्यात दिली.

रविवारी (१८ जून) दर्शना पवार हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सतीचा माळ या परिसरात सापडला. दर्शना पवार हिच्या अकाली निधनाने दत्तात्रय पवार व त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दर्शनाच्या निधनाची बातमी अतिशय दु:खद असून, अगदी तरुण वयात प्रतिभावान दर्शना पवार हिच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावून गेले. दर्शना पवार हिचा मृत्यू संशयास्पद असून, पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

दर्शना ही दत्तात्रय पवार यांची एकुलती एक मुलगी होती. दर्शनाच्या मृत्यूमुळे दत्तात्रय पवार व त्यांच्या कुटुंबीयांना अपार दु:ख झाले आहे. दर्शनाचा घातपात झाला असावा, असा तिच्या कुटुंबीयांना संशय असून, तसे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करून दर्शनाच्या मृत्यूचे गूढ उलगडावे व सत्य समोर आणावे, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज भ्रमणध्वनीवर संपर्क साधून केली आहे.

दर्शना पवार हिच्या संशयास्पद मृत्यूची नि:पक्षपातीपणे सखोल चौकशी करून आरोपीवर कायदेशीर कारवाई करावी व तसे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशीही मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.