ज्येष्ठांनी आरोग्याची काळजी घ्यावी – डॉ. दत्तात्रय मुळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : जेष्ठ नागरिक सेवा मंचचा शालेय साहित्याचे वाटप व आरोग्य शिबीरं हे उपक्रम कौतुकास्पद असून देणगीदारांनी, दानशूर व्यक्तींनी जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या माध्यमातून दानाचे पुण्य पदरी घ्यावं. सर्व जेष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी निरोगी जीवन जगाव असे विचार डॉ दत्तात्रय मुळे यांनी जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या तेविसाव्या वर्धापनदिनानिमित्त व्यक्त केले.

जेष्ठ नागरिक सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष कै भागचंद भाऊ ठोळे यांनी स्थापन केलेल्या जेष्ठ नागरिक सेवा मंचने आजतागायत अनेक सेवाभावी उपक्रम राबविले असुन नेहमीच सामाजिक सेवाभावी कार्यात सहभागी होऊन मदतीचा हात दिला आहे.

जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या तेविसाव्या वर्धापनदिनानिमित्त वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष विजय बंब यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करुन गुणवंत विद्यार्थी, आदर्श मातांचा यथोचित सन्मान करण्यात आला. जून महिन्यातील जन्मलेल्या जेष्ठ नागरिकांचाही सन्मान करण्यात आला.

मंचच्या अध्यक्षा सौ सुधाभाभी ठोळे, रजनीताई गुजराथी यांनी अहवाल सादर केला. डॉ. सौ. आचारी, सौ. सुधा भाभी ठोळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले. एस एल कुलकर्णी यांनी आर्थिक लेखाजोखा मांडला. वर्धापनदिनानिमित्त संस्थापक लेखापाल अमरनाथ लोंगाणी, एड. वाबळे, उद्योजक कैलास ठोळे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, साईगाव पालखीचे चव्हाण, सुनील फंड, निकम आणि मुंबादेवी तरुण मंडळ, शहरातील डॉक्टर, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आदि मान्यवर उपस्थित होते.

महंत रमेशगिरीजी महाराज, महानुभाव आश्रमाचे डॉ यशराज महाराज यांनी आशिर्वाद दिले.  सहज योग केंद्राच्या सरलादिदि यांनीही आशिर्वाद दिले. वर्धापनदिनानिमित्त जेष्ठ नागरिक सेवा मंचचे सर्व सभासद, जेष्ठ महिला समितीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पतसंस्था फेडरेशनचे काकासाहेब कोयटे यांच्याही शुभेच्छा लाभल्याने आनंद निर्माण झाला. तेविसाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. समारंभानंतर स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.