कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६: कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशन येथे बदली झाली आहे, तर अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची जळगाव येथे बदली झाल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व पोलीस निरीक्षक अनिल कटके या दोन्ही अधिकाऱ्यांनी कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावून गुन्हेगारी आळा घालण्यासाठी प्रयत्न केला.
अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवत अनेक गुन्ह्यांना वाचा फोडली. अवैध व्यवसायीकांवर पकड निर्माण केली माञ अवैध व्यवसाय समुळ नष्ट करण्यात पोलीस निरीक्षक अनिल कटके कमी पडले. अनिल कटके यांच्या बदलीमुळे स्थानिक गुन्हे शाखाची रिक्त जागा कोणाला मिळणार याकडे जिल्ह्याचे अधिक लक्ष लागले आहे. विशेषतः अवैध व्यवसायींकांची झोप उडाली आहे.
दरम्यान पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी कोपरगाव शहर, ग्रामीण तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये आपलं कर्तव्य बजावताना विविध सामाजीक, राजकीय धार्मीक संघर्षाला प्रतिकार करीत आपलं चोख कर्तव्य बजावले. अनेक सामाजीक उपक्रम राबवून समाजापुढे आदर्श निर्माण केला.
ते स्वतःच एक सायकलस्वार असल्याने कोपरगाव येथे सायकलस्वारांचा एक संघ निर्माण केला त्यातुन त्यांनी कोपरगाव ते थेट पंढरपूर सायकलवारी करुन वर्दीतली सायकल दर्दी व्यक्ती सिध्द केले. जाधव यांच्या बदलीने कोपरगाव करांच्या सायकलवारीतील उणीव भासणार आहे. शांत,संयमी व कायद्याचे तंतोतंत पालन करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली झाल्याने अनेकांना खंत वाटत आहे.
दरम्यान येथील स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्यासह जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकाच्या बदल्या नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी केल्या आहेत. तसे आदेश त्यांनी काढले आहेत. बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांना येत्या शिवजयंती उत्सव बंदोबस्तानंतर तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक कटके यांची जळगाव, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची नाशिक ग्रामीण, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांची धुळे तर सुनील पाटील यांची नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोण असणार व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी अनेकांनी वशिलेबाजी लावून तसेच मनात इच्छा बाळगुन बसलेले असल्याने कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे.