आढाव विद्यालयत शालेय क्रीडा महोत्सवाची सांगता

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कोपरगाव शहरातील एम. के. आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय आणि नगरपरिषद शिक्षण मंडळ कोपरगाव यांचे मार्फत दि.१४/०२/२०२३ ते १६/०२/२०२३  या कालावधीत शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर शालेय क्रीडा महोत्सवाची सांगता कार्यक्रमाचे दि. १६/०२/२०२३ रोजी कोपरगाव नगरपरिषदेचे मा.प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले साहेब, सभापती न.पा.शिक्षण मंडळ संदिप वर्पे, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी पराग संधान, प्रसिध्द उद्योजक शुशिलशेठ अरोरा, कोपरगाव शहरातील प्रसिध्द उद्योजक राजेश ठोळे, कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.के .आढाव विद्यालयाचे मुख्याध्यापक वानखेडे सर यांनी केले. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी शालेय उपक्रमाचा भाग म्हणून शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या शालेय क्रीडा महोत्सवात शहरातील अनेक शाळेचा सहभाग नोंदविला गेला. खो-खो, कब्बडी, लिंबू चमचा इ. मैदानी खेळांचा सहभाग या ठिकाणी केला जातो असे ते म्हणाले.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विध्यार्थ्यांसाठी शालेय शैक्षणिक साहित्यासाठी तसेच क्रीडा महोत्सवात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विध्यार्थ्यांसाठी ट्रॉफी इ.साहित्याचे वितरण करण्यात आले. अध्यक्षीय मार्गदर्शन करत असतांना मा.प्रशासक तथा मुख्याधिकारी साहेबांनी सदर क्रिडा महोत्सवाच्या आयोजना बाबत कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शालेय पाठ्यक्रमा बरोबरच खेळही खेळले पाहिजे जेणे करून बुद्धी विकास बरोबरच शारीरिक विकास देखिल तितकाच महत्वाचा असतो असे सांगितले.

 कार्यक्रमाचे आयोजन एम.के. आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय आणि नगरपरिषद शिक्षण मंडळ कोपरगाव यांचे मार्फत करण्यात आले होते. सूत्र संचलन एम.के.आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाच्या शिक्षिका बोराडे यांनी केले. कार्यक्रमासाठी एम.के.आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाचे सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.