शेवगाव तालुक्यात शिवजयंती उत्सव मोठया उत्साहात साजरा

शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव आज शेवगाव व तालुक्यात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले. सार्वजनिक उत्सव समितीने शहरात ठिकठिकाणी कमानी उभारुन सर्व मार्गावर दूतर्फा भगव्या पताका व ध्वज लावून संपूर्ण शहर भगवे केले.

क्रान्ती चौकात भव्य मंच उभारून त्यावर छत्रपतीचा सिंहासनारूढ भव्य पुतळा ठेवण्यात आला. सर्वत्र विद्यूत रोषणाईचा झगमगाट आणि छत्रपतीच्या पोवाडयाच्या ध्वनिफितीने, जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणांनी शहर दूमदूमून गेले. श्री जोग महाराज संस्कार केंद्राचे राम महाराज झिंजुर्के यांचे मार्गदर्शनाखाली सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची  भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.  

मुंडे चौकातून निघालेली मिरवणुक आंबेडकर चौक मार्गे क्रांती चौकात उभारलेल्या मंचापर्यंत आली. तेथे छत्रपतीचे पूजन करण्यात आले. या मिरवणुकीत श्री क्षेत्र आळंदीहून दीपक महाराज सुद्रिक व समाज प्रबोधनकार तथा भागवत कथाकार अनिताताई सुद्रिक महाराज यांच्या समवेत आलेल्या श्री ज्ञानाई मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या सुमारे शंभर वारकरी मुलींचे पथकाने मोठा रंग भरला. त्यांच्या पाठोपाठ शहीद भगतसिंग मित्र मंडळ, वडार समाज मित्र मंडळ, भोईराज तरुण मंडळ व शिवशक्ती महिला मंडळाचे ढोल पथक, लेझीम व झांज पथक, तसेच  जगदंबा महिला मंडळाच्या सदस्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या.


       प्रारंभी शहरातील सर्वच शिक्षण संस्थांतील मुलां मुलींच्या स्वतंत्र मिरवणुका निघाल्या. क्रान्ती चौकात कल्याण महाराज काळे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम झाला. शेवगाव रोटरी क्लबच्या सहाय्याने स्वराज मंगल कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात ११५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

        तर  छत्रपती शिवाजी चौकात  उभारण्यात येणाऱ्या  शिवस्मारक समितीच्या वतीने चौकातील छत्रपतींच्या अर्ध पुतळ्यास सकाळी गटविकास अधिकारी महेश डोके यांचे हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे  बाळासाहेब देशमुख, सुरेश घुले, स्मारक समितीचे डॉक्टर नीरज लांडे ,जगदीश धूत, सुनील रासने, नवनाथ कवडे, डॉ. कृष्णा देहाडराय यांचे उपस्थितीत अभिषेक घालण्यात येऊन पूजन करण्यात आले.

येथे राजलक्ष्मी लांडे या चिमुरडीने छत्रपतींच्या जीवनपटावर आवेशयुक्त भाषण केले तर ओंकार दारकुंडे याने पोवाडे गायले. शेवगाव आगारात या निमित्ताने सायली वरे व राज वरे या बालवक्त्यांची भाषणे झाली. सायंकाळी ६ वा. सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने क्रांती चौकात भव्य मिरवणूक  काढण्यात आली. यावेळी फटाक्याची मोठी आतषबाजी करण्यात आली.