कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : गोदावरी कालव्यांना आवर्तन कधी सुटणार हे अजून निश्चित झाले नाही. शेतकऱ्यांची रब्बीची पिके शेवटच्या पाण्यावर असून विहिरींनी तळ गाठला आहे, त्यामुळे पिके शेवटची घटका मोजत आहे. येत्या दोन दिवसात जर गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यांना आवर्तन सुटले नाही तर ही पिके हातातून गेल्याशिवाय राहणार नाही.
लाखोंचा पोशिंदा समजणाऱ्या शेतकऱ्यावर अशी परिस्थिती वारंवार येणार असेल तर ही दुर्दैवी बाब आहे. तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे पूर्ण दुर्लक्ष असून ते हा विषय गांभीर्याने घेत नसून केवळ प्रसिद्धीचा स्टंट म्हणून मागणी केल्याचा देखावा करतात. मात्र आता शेतकरी गप्प बसणार नसून त्यांच्या सहनशीलतेचा अंत संपलाय तेव्हा नाशिक पाटबंधारे विभागाने तातडीने २२ फेब्रुवारी पर्यंत गोदावरी कालव्यांना पाणी सोडावे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते नितीन औताडे यांनी केली आहे.
यावर्षी धरण पाणलोट क्षेत्रात भरपूर पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे गोदावरी डावा व उजवा कालव्याला रब्बी हंगामात दोन आणि उन्हाळी हंगामात तीन असे पाच आवर्तन पाटबंधारे विभागणी दिली पाहिजे होती.मात्र केवळ रब्बीसाठी एक व उन्हाळ्यासाठी तीन आवर्तन त्यांनी जाहीर केले मात्र जाहीर केलेले आवर्तनही वेळेत नसल्याने शेतकऱ्यांना आता आपल्या पिकांना पाणी देण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या शेतात रब्बी हंगामातील गहू, कांदा, मका व इतर पिके उभी आहेत. उन्हाच्या झळा वाढत असून, सध्या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. जर पिकांना पाणी मिळाले नाही तर पाण्याअभावी पिके वाळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मागिल आवर्तन सोडल्यानंतर पाटबंधारे विभागाने ते केवळ पंधरा दिवस चालवले. तालुक्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व गाव तळ्यांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे अगोदर पिण्याच्या पाण्यासाठी पाच सात दिवस हे तळे भरण्यासाठी जाणार असल्याने पाटबंधारे विभागाने कोणतीही दिरंगाई न करता कालव्यांना तातडीने आवर्तन सोडले पाहिजे.
आधीच होरपळत असलेल्या शेतकऱ्याने रब्बीचे पिके उभे करण्यासाठी बँकेत दागिने गहाण ठेवून, उसनवार पैसे उपलब्ध केले आहे. आता मात्र तीच पिके डोळ्यासमोर उधवस्त होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. धरण पानलोट क्षेत्रात पाण्याची उपलब्धता असून देखील पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे.
शेतकरी आता जागृत झाले असून अन्याय तरी कुठपर्यंत सहन करायचा अशी चर्चा प्रत्येक चौकात ऐकायला मिळत आहे. तेव्हा गोदावरी कालव्यांना तातडीने आवर्तन सोडावे अशी मागणी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते नितीन औताडे यांनी केली आहे.