नवजीवन माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : जनता शिक्षण प्रसारक मंडळ  संचलित, नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दहिगाव-ने येथील  दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत निरोप देण्यात आला. प्रारंभी सरस्वती पूजन, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अशोक उगलमुगले होते.

       यावेळी उगलमुगले म्हणाले, परीक्षा ह्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील विकासासाठी महत्त्वाचा भाग असून त्यातून आत्मपरीक्षण करता येते. परीक्षेत मी पास होणारच हा आत्मविश्वास प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या मनात बाळगावा. विद्यार्थ्यांनी नकारार्थी विचार डोक्यातून काढून टाकून परीक्षेला सामोरे जावे.

आई-वडील व गुरुजन वर्ग यांचे आशीर्वाद तसेच जिद्द, कष्ट करण्याची तयारी व आत्मविश्वास असेल तर जीवनातील कोणतीही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता. म्हणून जीवनातील कोणत्याही परीक्षेला विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे. स्व. लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या विकासाचे जे स्वप्न बघितले होते ते आज प्रत्यक्षात साकार झाल्याचे दिसत आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थी हा कोणत्याच क्षेत्रामध्ये आता मागे राहिलेला नाही.

         केंद्र संचालक प्रा.काकासाहेब घुले यांनी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेची नियमावली समजावून सांगितली. यावेळी उपप्राचार्य सुनिल शिंदे, देवराम सरोदे, दिपक खरात, मच्छिंद्र पानकर, सिकंदर शेख, बापूसाहेब लोढे यांनी ही मनोगते व्यक्त केली.  सायली कसबे, श्रद्धा पाठे, धनश्री सोनवणे, ऋतुजा जाधव, कावेरी जगदाळे, प्रज्ञा चव्हाण, सेजल कांबळे , आर्यन दळवी आदि विद्यार्थ्यांनी ही मनोगते व्यक्त करून शाळेतील आठवणींना उजाळा दिला. विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. प्रिती काळे हिने प्रास्ताविक केले. प्रियंका मरकड, प्रतीक्षा शेरे यांनी सूत्रसंचालन तर अमृता घुले हिने आभार मानले.