एसटी कामगार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी धनवडे तर सचिवपदी देवडे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २० :  शेवगाव आगारातील कामगार संघटनेच्या काल रविवारी. झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आगाराच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी एसटी कर्मचारी कामगार संघटनेच्या शेवगाव आगाराच्या अध्यक्षपदी संजय धनवडे तसेच सचिव पदी राजेंद्र उर्फ सोमनाथ गंगाधर देवढे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

      संघटनेचे विभागीय अध्यक्ष शिवाजीराजे कडूस, प्रादेशिक सचिव ज्ञानदेव अकोलकर, विभागीय कार्याध्यक्ष रोहिदास अडसूळ, पाथर्डी आगाराचे कामगार संघटनेचे अध्यक्ष अंबादास शिरसाठ, सचिव बाळासाहेब सोनटक्के, शेवगाव आगारातील, कामगार संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक दिलीप लबडे, यांच्या  उपस्थितीत ही बैठक शिवजयंतीच्या दिवशी पार पडली.   संघटनेच्या कार्याध्यक्ष पदी दत्तात्रय चितळे तर महिला संघटनेच्या अध्यक्षपदी सुवर्णा देवकाते, सचिव पदी मंगल विलायते यांची निवड जाहीर करण्यात आली.

      नूतन पदाधिका-यांनी आगारातील कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सर्वांना बरोबर घेवून काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कामगार संघटनेचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. संघटनेचे मार्गदर्शक लबडे यांनी आगारातील संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेवून नूतन वर्षात करावयाच्या विविध कामांची माहिती दिली.