शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : प्रवरा मेडीकल ट्रस्ट संचलित येथील शेवगाव इंग्लिश मेडीयम स्कुल अँण्ड जुनिअर काँलजमध्ये इयत्ता ११ वीच्या १०५ आदिवासी विदयार्थ्यांनी रात्री उशीरा वस्तीगृह सोडून पायी नाशिक येथील आदिवासी आयुक्त कार्यालयास जाण्याची वाट धरली. एकच खळबळ उडाली. महाविदयालयात या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून शासनाच्या निकषाप्रमाणे सोयी सुविधा दिल्या जात नसल्याच्या तक्रारीवरून या विदयार्थ्यांचा उद्रेक झाल्याची या विद्यार्थ्याची भूमिका होती. रात्री उशीरा पोलीस, आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या विदयार्थ्यांची समजूत काढली व पहाटे विदयार्थी पुन्हा महाविदयालयात परतले.
आदिवासी विदयार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे म्हणून राज्यातून अडीच हजार आदिवासी विदयार्थी निवडून त्यांना वेगवेगळ्या शाळेत पाठवले जाते. शेवगाव येथे नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागातील सुमारे १२५ विदयार्थी व २५ विदयार्थीनी अशी १५० विदयार्थी येथे आहेत. या विदयार्थ्यांना राहण्या जेवणासह सर्व सुविधा पुरविल्या जाव्यात असे असताना विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा नसल्याने बाथरुमधील पाणी प्यावे लागते.
पुरेशा स्नानगृहाची व शौचालयांची सोय नसल्याची, वस्तीगृहा ऐवजी आयुर्वेदिक महाविदयालयाच्या खोल्यामध्ये दाटीने ठेवल्याची, तसेच आदिवासी विदयार्थ्यांना स्वतंत्र क्लासरुम मध्ये बसवले जाते. काही शिक्षकांकडून जातीवाचक उल्लेख केला जातो. आशा तक्रारी या विदयार्थ्यांनी केल्या.
इ.१ ली ते १० वीच्या सुरु असलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात या विदयार्थ्यांना बसू दिले नाही. त्यामुळे सदर विदयार्थ्यांनी गोंधळ घालून कँम्पस सोडून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. विदयार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही.
– एस.आर.प्रधान
– प्राचार्य – इंग्लिश मेडीयम स्कुल अँण्ड जुनिअर काँलज, शेवगाव
याबाबत आदिवासी प्रकल्प विभागाच्या अधिका-यांकडे वारंवार तक्रारी करुनही दखल घेतली जात नव्हती. म्हणून विदयार्थ्यांनी काल शुक्रवारी ( दि .२४ ) रात्री अचानाक नाशिक आदिवासी आयुक्तांकडे जाण्यासाठी पायी मोर्चा काढला. ही माहिती कळताच पोलीस व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी पाठलाग करून नेवासा रस्त्यावर या विदयार्थ्यांना अडवून जवळच एका मंगल कार्यालयात थांबविले. आणि आदिवासी प्रकल्प विभागाच्या अधिका-यांशी भ्रमनध्वनीवरुन संपर्क करुन त्यांना येथे येण्यास भाग पाडले.
दरम्यान आज सकाळी हे विदयार्थी प्रा. किसन चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, प्रवरा मेडीकल ट्रस्टचे पंजाबराव आहेर, नकुल तांबे, काँलेजचे प्राचार्य एस.आर. प्रधान, प्राचार्य डॉ. बी.टी. शिंदे, प्राचार्य डॉ .ओंकार रसाळ, संचालिका श्रीमती परांजपे आदिंची एकत्रीत बैठक झाली.
शेवगाव येथे घडलेल्या प्रकाराबाबत आमच्या विभागाच्या अधिका-यांनी या विदयार्थ्यांची लगेच समक्ष भेट घेवून त्यांच्या तक्रारी व म्हणणे ऐकूण घेतले असून त्या तक्रारींचे निराकरण करण्यात यावे. अशा सुचना संबंधीत संस्थेला देण्यात आल्या आहेत.
संदिप गोलाईत –
अप्पर आयुक्त – आदिवासी विभाग नाशिक
विदयार्थ्यांनी त्यांच्या समस्या महाविदयालयीन प्रशासनासमोर मांडल्या. या सर्व समस्यांचे निराकरण आठ दिवसात झाले नाही तर या विदयार्थ्यांसह नाशिक आयुक्त कार्यालयाकडे जावून जाब विचारण्यात येईल. तसेच संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात येईल असे प्रा. चव्हाण म्हणाले.