अवकाळी पावसाने उभी पिकं आडवी केली
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : कोपरगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. तर सोमवारी राञभर कोपरगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा काढणीला आलेला गहु, हरभरा भूईसपाट झाला.
तर ब्राम्हणगाव शिवारातील मंडपी नाल्याजवळ गोदावरी डावा कालवा फुटल्याने त्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जावून उभ्या पिकासह शेतीचे मोठे नुकसान झाल्याने लाखो रुपयांचा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे.
कालवा फुटल्याने कुसुम बनकर, ज्ञानदेव शिंगाडे, माधव तडाखे, एकनाथ शिंगाडे, हरिश्चंद्र सोनवणे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जावून शेतीसह पिकांचे नुकसान झाले या घटनेची माहीत मिळताच तहसीलदार विजय बोरूडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून फुटलेला कालवा दुरुस्त करण्याच्या सुचना संबंधित विभागाला देत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करुन शासनाला अहवाल पाठवण्याची व्यवस्था केली.
दरम्यान अचानक जोराचा पाऊस पडल्याने तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा गहु, हरभरा, मका, ऊस द्राक्ष, डाळींब, आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काढणीला आलेला हरभरा गहु पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.
काढलेल्या कांद्याचे भाव कोसळलेले असतानाच, अवकाळी पावसाच्या तडाख्याने तालुक्यातील डाऊच येथील एका शेतकऱ्याने दोन एकर कलिंगडाची लागवड केली होती. मात्र अवकाळी पावसाचा फटका बसल्याने काढणीला आलेल्या कलिंगडाचे नुकसान झाल्याने लाखो रुपयाचे काही क्षणात नुकसान झाले.
सोमवारी राञी कोपरगाव तालुक्यात मंडल निहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे- कोपरगाव – ७ मि.मि, पोहेगावं – ४ मि.मि, रवांदे- १४.२ मि.मि., दहेगाव बोलका- ४ मि.मि., सुरेगाव- ३.७ मि.मि. पाऊस पडला असुन कोणतीही जीवीत हानी झाली अशी माहीती तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिली.
ब्राह्मणगाव शिवारातील मंडमी नाल्याजवळ वारंवार गोदावरी डावा कालवा फुटतो. या भागातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान सतत होत असतानाही संबधीत पाटबंधारे विभागाकडून त्या ठिकाणी मजबूत नाला दुरुस्ती करीत नसल्याने या भागातील शेतकरी व नागरीक मेटाकुटीला आले आहेत.