कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : महाराष्ट्रात कोयटे परिवाराने सहकार, शैक्षणिक, सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळविलेला आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये कोयटे परिवार नेहमीच सहभागी होत असतो. विविध पदांवर काम करताना समता परिवाराचे मोलाचे मार्गदर्शन मिळत असते. त्यामुळेच आज समता इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थी केंद्रित शाळा म्हणून नावारूपाला आली असून देश, परदेशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे. समता परिवारामुळे मला हा सन्मान मिळाला आहे त्यामुळे हा सन्मान समता परिवारातील महिलांचा असल्याचे सौ.स्वाती संदीप कोयटे यांनी सांगितले.
प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय नाशिक यांचेवतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त, समता महिला बचत गटाच्या सचिव आणि सुधनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या सौ.स्वाती संदीप कोयटे यांना कोपरगाव येथे राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सरला दिदी यांचे हस्ते ब्रम्हाकुमारीज नारी शक्ती पुरस्काराने कोपरगाव येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय केंद्रात घेण्यात आलेल्या विशेष समारंभात सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सरला दिदी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना म्हणाल्या की, महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात महिलांनी मोठया प्रमाणात सहभाग घेऊन महत्वपूर्ण पदांवर ठसा उमटविलेला आहे. वेगवेगळ्या पदांवर त्या देत असलेल्या योगदानाबद्दल त्यांचाही सन्मान होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील महिलांचा सन्मान करत असतो. यामुळे त्यांना त्या पदांवर काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि आत्मविश्वास ही वाढीस लागतो.
प्रसंगी कोपरगाव तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ही ब्रम्हाकुमारीज् नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे, जिल्हा बॅंकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे, सौ.सुधाभाभी ठोळे, शितलताई वाबळे, रश्मीताई जोशी, मनजीतकौर पोथीवाल, रेखाताई उंडे, अनुपमाताई बोर्डे, सिमरनताई खुबाणी, संजीवनीताई शिंदे, मंगलताई वल्टे, पुजाताई शर्मा, रत्नाताई पाटील यांचेसह राजयोग अध्यात्मिक ध्यान केंद्राचे साधक, साधिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सौ.स्वाती कोयटे यांना मिळालेल्या नारी शक्ती सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.