न केलेल्या कामाचे श्रेय घेता, मग आपल्या कार्यकाळात काय केले – माधवी वाघचौरे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : ज्यांचे भूमिगत गटारीसाठी कवडीचे योगदान नाही. त्यांनी आमच्यामुळे या गटारीचे काम सुरु झाल्याची टिमकी वाजवायला सुरुवात केली असून ज्यांना त्यांच्या कार्यकाळात काही करता आले नाही ते आता न केलेल्या कामाचे श्रेय घेत आहे मग त्यांनी आपल्या कार्यकाळात काय केल? असा तिरकस सवाल राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका माधवी वाकचौरे यांनी भाजपच्या माजी नगरसेविका वैशाली आढाव यांना विचारला आहे.

बुब हॉस्पिटल ते श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल पर्यंत दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.त्यामुळे त्या ठिकाणी भूमिगत गटार व्हावी अशी नागरिकांची मागील अनेक वर्षापासुनची मागणी होती. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांच्याकडे हि मागणी मांडण्यात आली. त्यावेळी नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनीच मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना सूचना करून बुब हॉस्पिटल ते श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल पर्यंत भूमिगत गटार बांधण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार भूमिगत गटारीचे काम सुरु झाले आहे.

मात्र ज्यांना त्यांच्या कार्यकाळात काही करता आले नाही त्यांनी फुकटचे श्रेय घेण्यासाठी सुरु केलेली धडपड केविलवाणी आहे. ज्यांना हे माहित नाही की, हि भूमिगत गटार बुब हॉस्पिटल ते श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल पर्यंतच बांधण्यात येणार आहे. मात्र त्यांनी श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगर पर्यंत भूमिगत गटारीचे काम आमच्यामुळे सुरु झाल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करून कोणतेही योगदान नसतांना फुकटची प्रसिद्धी मिळवण्याचा खटाटोप हास्यास्पद आहे. खोट्या बातम्या देतांना काळजी घेत चला. सुरु असलेले काम आपले नाही याकडे दुर्लक्ष करा परंतु प्रत्यक्षात ते काम किती होणार आहे याची खातरजमा करा असा उपरोधिक सल्ला देखील माजी नगरसेविका वाकचौरे यांनी भाजपच्या माजी नगरसेविका वैशाली आढाव यांना दिला आहे.

मागील अनेक वर्षापासून बँक कॉलनी, मंजुळ अपार्टमेंट परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात रस्यावर साचणाऱ्या पाण्याचा त्रास होत होता. मात्र ज्यांच्याकडे प्रभागाच्या विकासाची सूत्रे होती त्यांना कधीही हा प्रश्न सोडवावा असे  वाटले नाही. त्यामुळे भूमिगत गटारीचा प्रश्न प्रलंबित होता व नागरिक देखील मुकाट्याने होणारा त्रास सहन करीत होते.

मात्र ज्यावेळी आ.आशुतोष काळे यांच्याकडे या भूमिगत गटारीचा प्रश्न मांडला त्यावेळी त्यांनी तात्काळ मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना बुब हॉस्पिटल ते श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल पर्यंत भूमिगत गटार बांधण्याच्या सूचना केल्या. त्या सूचनेनुसार या भूमिगत गटारीचे काम सुरु झाले आहे. मात्र ज्यांचे याच्यात काडीचे योगदान नाही ते श्रेय घेण्यासाठी सर्वात पुढे आहे याबाबत बँक कॉलनी, बुब हॉस्पिटल, मंजुळा अपार्टमेंट परिसरातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.