पोहेगाव नागरी पतसंस्थेला १ कोटी ८३.३३ लाखांचा नफा – नितिनराव औताडे

कोपरगाव  प्रतिनिधी, दि. ११ :  कोपरगाव तालुक्यातील पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या पोहेगाव नागरी पतसंस्थेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात विविध ग्राहकाभिमुख सेवांच्या जोरावर वर्षभरात तब्बल 1 कोटी 83 लाख 32 हजार 977 रुपये नफा मिळवला. ग्राहक सेवेस केंद्रस्थानी ठेवून केलेल्या पारदर्शक व्यवहारामुळे ठेवीदारांचा विश्वास संपादन करीत ठेवींमध्ये वाढ होऊन 152 कोटी 11 लाख 10 हजार 830 रूपये झाल्या असल्याची माहिती पोहेगांव नागरी  पतसंस्थेचे संस्थापक उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते नितिनराव औताडे यांनी दिली आहे.

संस्थेच्या 31 मार्च 2023 अखेरच्या आर्थिक स्थितीची माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे यांनी सांगितले की, संस्थेची वार्षिक उलाढाल 939 कोटी 2 लाख 34 हजार 789 रूपये  इतकी आहे, एकूण कर्ज वाटप 88 कोटी 63 लाख 69 हजार 119 रुपये, भाग भांडवल 1 कोटी 31 लाख 62 हजार 633 रुपये आहे. संस्थेची गुंतवणूक 82 कोटी 71 लाख 31 हजार  613 रुपये आहे ही एकूण ठेवीच्या 54.37 टक्के इतकी असल्याने संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत झालेली आहे.
संस्थेची स्थावर मालमत्ता 2 कोटी 92 लाख 91 हजार 155 रूपये इतकी असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थेत उपलब्ध असलेल्या मोबाईल बँकिंग ॲप सुविधा, क्यु आर कोड सुविधेमुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहारात सुलभता व तत्परता निर्माण झालेली आहे. संस्थेच्या तिन्हीही शाखांमध्ये क्यू आर कोड सुविधा सुरू केल्याने संस्थेच्या खातेदारांना कॅशलेस व्यवहार करता येणे शक्य झाले.एक हजार ग्राहक क्यु आर कोड चा वापर करत आहे.संस्थेने स्वतःचा आय एफ एस सी कोड घेतलेला असुन संस्थेने ग्राहकांना ॲप सुविधा दिल्या असल्याने ग्राहकांना संस्थेमधील आपले सर्व व्यवहार या ॲपवर आपल्या मोबाईलवर बघता येतात.

संस्थेचा प्रगतीचा आलेख संस्थेचे संस्थापक नितिनराव औताडे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे, उपाध्यक्ष विलासराव रत्ने व सर्व संचालक मंडळ, मुख्य व्यवस्थापक सुभाष औताडे, पोहेगांव शाखेचे व्यवस्थापक विठ्ठल घारे, शिर्डी शाखेचे व्यवस्थापक सोमनाथ मोजड, कोपरगाव शाखेचे व्यवस्थापक रमेश हेगडमल, वसुली अधिकारी, सभासद, ठेविदार, कर्मचारी व कलेक्शन प्रतिनिधी यांच्या सर्वांच्या सहकार्याने वाढतच चाललेला आहे.

ग्राहकांच्या सेवेसाठी संस्थेने सुसज्ज अशी कोपरगाव शाखेसाठी इमारत उपलब्ध करून दिली आहे. अत्याधुनिक सेवा, स्ट्राँग रूम, वीज बिल भरणा केंद्र , आरटीजीएस, एनएफटी सोनेतारण कर्ज अदि सुविधा मुळे व पारदर्शक व्यवहारामुळे कोपरगाव शाखेच्या ठेवीत दैनंदिन व्यवहारामुळे वाढ होत आहे. दिवसेंदिवस संस्थेवर ग्राहकांचा विश्वास वाढत आहे. शेतकऱ्यांना कमी व्याज दारात जास्त सोने तारण कर्ज या संस्थेमार्फत मिळत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.

संस्थेच्या पोहेगाव कोपरगाव शिर्डी परिसरातील शाखांमार्फत व्यवसाय वाढवणे, बाजारपेठेला हातभार लागावा व बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने संस्थेच्या शाखेमार्फत कर्ज वितरण करण्यात येते संस्थेचे कर्जवाटप व वसुली यापुरतेच कार्य नसून संस्था सामाजिक बांधिलकी जोपासत असताना मोफत सर्वरोग निदान शिबीर, मोतीबिंदू शिबीर व विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत असल्याची माहितीही नितीनराव औताडे यांनी दिली.