कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : कोपरगाव येथे मागील अनेक वर्षापासून प्रत्येक महिन्याला आर.टी.ओ. कॅम्प होत असल्यामुळे वाहनधारकांची मोठी सोय होत होती. परंतु श्रीरामपूरच्या परिवहन अधिकाऱ्यांनी या कॅम्पमध्ये एप्रिल महिन्यापासून नवीन लर्निग लायसन्स देण्याची सुविधा बंद केल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कोपरगाव येथे आर.टी.ओ. कॅम्पमध्ये नवीन लर्निग लायसन्स देणेची सुविधा पूर्ववत सुरु करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्यांच्या परिवहन आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, परिवहन विभागामार्फत कोपरगाव येथे दर महिन्याला आर.टी.ओ.चे तीन कॅम्प होतात. या कॅम्पच्या माध्यमातून लर्निंग लायसन्स, लायसन्स टेस्ट, वाहनांचे रजिस्ट्रेशन व जुन्या वाहनांचे रिपासिंग आदी महत्वाची कामे होत असल्यामुळे वाहनधारकांची मोठी सोय होत होती. परंतु श्रीरामपूर परिवहन विभागाकडून कोपरगावला होणाऱ्या आर.टी.ओ. कॅम्पमध्ये नवीन लर्निग लायसन्स देण्याची सुविधा एप्रिल महिन्यापासूनअचानकपणे बंद केली आहे. त्यामुळे ज्या वाहन धारकांना नवीन लर्निंग लायसन्स काढायचे आहे त्यांना श्रीरामपूर येथे जाणे गैरसोयीचे होतआहे.
त्यामुळे वाहनधारकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेवून कोपरगावला होणाऱ्या आर.टी.ओ. कॅम्पमध्ये नवीन लर्निग लायसन्स देण्याची सुविधा तातडीने पूर्ववत सुरु करण्यासाठी सबंधित विभागाला सूचना कराव्यात अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.