काळे-कोल्हेंच्या प्रयत्नांना अपयश, बाजार समितीच्या निवडणुकीत ३८ उमेदवार रिंगणात

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २०: कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तालुक्याचे दिग्गज नेते प्रयत्नशील होते. मात्र अखेरच्या क्षणी काळे-कोल्हे- परजणे -औताडे यांच्या प्रयत्नांना अपयश आल्याने अखेर या निवडणुकीच्या रिंगणात तब्बल ३८ उमेदवार उतरले आहेत.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून १८ जागांसाठी १०४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६३ उमेदवारांनी माघार घेतली तर ३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये अनुसूचीत जातीमधून रावसाहेब रंगनाथ मोकळ, भटक्या विमुक्त जाती मतदार संघातून रामदास भिकाजी केकाण तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधून अशोक सोपान नवले यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

उर्वरित जागांपैकी सर्वसाधारण (वि.का. सोसायटी) मतदार संघाच्या सात जागेसाठी सोळा, महिला राखीव (वि.का. सोसायटी) दोन जागांसाठी चार , इतर मागास वर्ग एक जागेसाठी तीन, सर्वसाधारण (ग्रामपंचायत) दोन जागांसाठी चार, व्यापारी अडते मतदार संघातून दोन जागांसाठी आठ तर हमाल मापाडी मतदार संघातील एक जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

३० एप्रिल रोजी सकाळी आठ ते दुपारी चार पर्यत सदर जागांसाठी मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार असल्याची माहिती सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी दिली.

दरम्यान तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, महानंद दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, शिवसेनेचे नेते नितीन औताडे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनु असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकारणाला फाटा देऊन सहमती एक्स्प्रेस करीत संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

मागील दोन वेळेसच्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यातील या नेत्यांनी निवडणूक बिनविरोध करून कृषी उत्पन्न बाजार्सामितीला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. याही वेळेस तितक्याच ताकदीने प्रयत्न करून हि विरोधी गटाच्या कार्यकर्त्याची मन मिळवणी करू न शकल्याने अखेर २००८ नंतर प्रथमच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ काळे -कोल्हे यांच्यावर काही ठराविक कार्यकर्त्यामुळे ओढावली आहे.

ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, माजी उप जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, विष्णू पाडेकर, यांच्या बरोबरच कायम प्रस्थापिंताच्या विरोधात आवाज उठविणारे विधिज्ञ दिलीप लासुरे यांनी एकत्र येऊन प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित अशी नवीन लढत या निवडणुकीच्या माध्यमातून सुरु केल्याने आगामी काळात याचे काय परिणाम होतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.  

कोपरगाव तालुक्यातील सहकारी संस्थांमध्ये काळे, कोल्हे व परजणे यांनी राजकारणाला फाटा देवुन सहकार टिकवण्या बरोबर वाढवण्याचे काम केल्यामुळे आज तालुक्यातील सहकारी संस्था उर्जीत अवस्थेत आहेत… 

 तालुक्यातील इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काळे कोल्हे या प्रस्थापितांच्या विरोधात एकवटले तरी त्यांच्या मागे तालुक्यातील जनता किती ताकतीने उभी राहते यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे….