कोपरगाव प्रतीनिधी, दि. २९ : तालुक्यात शुक्रवारी दुपारी साडेतीन ते सहा वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वा-यासह अवकाळी पाउस झाल्यांने त्यात चासनळी येथील चार आदिवासी घरकुलांचे तसेच शेतक-यांचे कांदा गहू ज्वारी भाजीपाला ऊस फळे रब्बीसह बागायती पिकांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले आहे.
याबाबतची माहिती अशी की, एप्रिल महिन्यात वादळी वा-यासह जोरदार अतिवृष्टी होण्याबाबतचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्याप्रमाणे शुक्रवारी २८ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जोरदार वादळी वा-यासह अवकाळी पाउस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतक-यांसह गोर गरीब नागरिकांसह जनावरांचे हाल झाले.
पावसाचे थेंब टपोरे असल्यांने त्यापासून जनावरांचा बचाव होवु शकला नाही. सोसाटयाचा वारा असल्याने शेतक-यांनी शेतात चारा कडबा रचुन ठेवला होता त्याचे नुकसान झाले. चासनळी आदिवासी परिसरातील श्रीमती सिताबाई त्रंबक माळी, ताराबाई भिमा माळी, संतोष एकनाथ पवार, विलास निवृत्ती सुर्यवंशी यांच्या राहत्या घरांचे नुकसान झाले, भिंतींना तडे गेले, पत्रे उडुन गेले, भिंती पडल्या असुन त्याबाबतची माहिती भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी तहसिलदार विजय बोरूडे यांच्यासह मंडळ अधिका-यांना कळवुन या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सुचना दिल्या.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक मनेष गाडे, बाळासाहेब गाडे व चासनळी परिसरातील अन्य पदाधिका-यांनी समक्ष घटनास्थळास भेट देवुन शासकीय यंत्रणेस त्याची माहिती दिली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना शासनाने तातडीने मदत द्यावी अशी मागणी केली.