दत्त जयंती निमित्त ९ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

शेवगाव प्रतिनिधी, दि.१४: अष्टांग योगतज्ज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेवगावच्या वैशंपायन नगरमधील दत्तभूमीत दि. २६ डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या दत्त जयंती सोहळ्यानिमित्त ९ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुरुदत्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अर्जुन फडके व सचिव फुलचंद रोकडे यांनी केले आहे.

सोमवार दि.१८ ते रविवार दि.२४ डिसेंबर दरम्यान गुरुचरित्र पारायण होणार आहे. सोमवार दि.२५ डिसेंबरला सकाळी ९.३० वाजता सामूहिक श्री सत्यदत्त पूजाविधी होणार आहे. श्री दत्त जयंतीचा मुख्य सोहळा मंगळवारी होणार आहे. सकाळी साडेसात वाजता मुख्य दत्तमुर्ती, प.पू.दादाजीची मुर्तीवर व श्री स्वामी समर्थ महाराज पादुकांवर अभिषेक,सामूहिक मंत्रजप, आरती करण्यात येईल. दुपारी ३ वाजता पालखी सोहळा, त्यानतर सायंकाळी ४ वाजता श्री.दयानंद महाराज कोरेगावकर (कर्जत) यांचे दत्त जन्मोत्सवाचे कीर्तन व महाआरती त्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.