पोलीसांच्या कारवाईतुन गुटखा बंदी की, विक्रीला संधी

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्यात ज्या ज्या गुटखा विक्रेत्यांवर किंवा मावा विक्रेत्यांवर पोलिसांनी धाडी टाकुन कारवाया केल्या त्यापैकी बहुतांश गुटखा विक्रेत्यांचे आजही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री जोमात सुरु आहे तर कारवाई करणारे पोलीस व अधिकारी कोणत्या कारणाने कोमात आहेत. 

एखाद्या गुटखा विक्रेत्याला कायद्याचा दणका दिल्यानंतर त्याला पोलिसांची अथवा अन्न व औषध प्रशासनाची भिती बसण्याऐवजी तो गुटखा विक्रेता पुन्हा जोमाने कसा काय विक्री करु शकतो. त्याला गुटखा विक्री करण्यासाठी कोणा कोणाचा अर्थपूर्ण पाठिंबा असतो.  स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी गुटखा विक्रेत्यांना सूट इतर अवैध व्यवसाय करणाऱ्याबरोबर इतके दयाळू कसे वागतात. कायद्याचे रक्षकच जर भक्षक होत असतील तर गुन्हेगारी विश्वाला खतपाणी घातल्या सारखे आहे.

 तालुक्यात अनेक गुटखा किंग आजही राजरोसपणे गुटखा विक्री करतात. पोलीसांच्या कारवाईतुन गुटखा विक्री बंद तर होतच नाही, उलट जोमाने विक्री सुरू होते हे आता हळूहळू सिद्ध होत आहे. जिल्ह्याचा तिसरा डोळा म्हणून ओळख अलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात कोण कोण गुटखा विक्री करतो, किरकोळ विक्रेत्या पासुन ठोक व घाऊक विक्रेत्यांची यादी असण्याची शक्यता आहे. त्या यादीचा उपयोग हे कर्मचारी दर महिन्याला केवळ भेटीगाठीसाठी करतात की, गुटखा बंदीसाठी करतात अशी शंका नागरिकांमधून व्यक्त केली जाते. अर्थपूर्ण दर महिन्याला काही पोलीस कर्मचारी गुटखा विक्रेत्यांकडे का येतात. जर येत असतील तर तो गुटखा विक्रेता गुटखा विक्री कोणाच्या बळावर करतोय. 

 माणसांच्या जीवाला घातक असणाऱ्या जीवघेण्या गुटख्याने अनेकांचे आयुष्य बरबाद झाल्याने अखेर महाराष्ट्र शासनाने राज्यात गुटखा बंदी घालुन राज्याच्या भावी पिढीला जीवदान देण्याचा प्रयत्न करीत असताना, एका बाजुला शासनाचे रक्षकच भक्षक झाल्याचे चिञ दिसुन येते. गुटखा बंदीच्या नावाखाली कडक कारवाई करण्याचे अधिकार पोलीस तसेच अन्न औषध व प्रशासनाला असताना केवळ थातुरमातुर कारवाई करण्यात धन्यता मानल्याचे अनेक उदाहरणे पुढे आले आहेत. 

गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची जरब राहण्याऐवजी कारवाई झालेला गुटखा विक्रेता पुन्हा पुन्हा गुटखा विक्री का करतोय.  स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हे कोपरगाव तालुक्यात पोलीस निरीक्षक म्हणून कामकाज पाहिलेले असतानाही त्यांच्या कार्यकाळात तालुक्यातील बड्या गुटखा विक्रेत्यांना पकडू शकले नाहीत. छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करुन गुटखा बंदीचा ढोल वाजवला. त्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर कारवाया केल्या ते सर्वजण अजुनही गुटखाकिंग म्हणून राजरोसपणे वावरतात.

लोकसंवादने तालुक्यातील गुटखा विक्रेत्यांची वंशावळी जनतेसमोर मांडून काही कालावधीसाठी जिल्ह्यातील गुटखा विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. काही काळ गुटखा बंद झाला, पण गुटखा विक्रीतील आर्थिक चक्र फिरवणाऱ्यांच्या पोटात मळमळ सुरु झाल्याने त्यांच्या छुप्या मार्गाने जिल्ह्यात गुटखा विक्रीने पुन्हा डोकं वर काढलं. 

अधिकाऱ्यांनी जर मनापासून ठरवलं तर जिल्ह्यात गुटखा विक्री होणारच नाही.  माञ मुकसहमतीने केवळ आर्थिक तडजोडीच्या अभिलाषापोटी गुटखा बंदीच्या नावाखाली कोणाला संधीच मिळवायची असेल, तर गुटखा बंदी नावालाच आहे का? जबाबदारीने सर्वांनी जनहितासाठी काम केले तर गुटखा बंदीच काय कोणताही अवैध व्यवसाय सुरु करताना शंभर वेळा विचार करावा लागेल. अशी दहशत कधी निर्माण होणार.

 तालुक्यातील बडे गुटखा किंग छोट्या व्यावसायिकांना गुटखा विक्रीस भाग पाडतात. पोलीस किंवा इतर प्रशासन छोट्यावर कारवाई करतात पण मोठ्या गुटखा माफियावर कारवाई का करीत नाहीत. किंवा पोलीसांचा गुप्त खबऱ्या त्यांच्यापर्यंत कसा पोहचत नाही अशी शंका नागरिकांमधून व्यक्त होत आहे.